पान:विवेकानंद.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

वर्णनावरून दिसून येते. आर्य लोक हैं आसव स्वतः पीत व ते इंद्रादि देवतागणालाही अर्पण करीत. कित्येक वेळां अतिशय सोमपान केल्यामुळे इंद्र धुंद झाला होता असेही वर्णन आढळते. त्याचप्रमाणे आर्यलोकही कित्येक वेळां अतिरिक्त सोमपान करीत होते असेही वर्णन आहे. एके वेळीं अतिशय सोमपान करून इंद्र भलत्याच गोष्टी बरळू लागल्याचे वर्णन केले आहे. इंद्रासारखाच दुसरा वरुण नांवाचा एक देव आहे. तो अत्यंत शक्तिमान् असून आपल्या भक्तांचे संरक्षण करतो व भक्तही त्यास सोमरसाचे अर्पण करतात असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे एका युद्धदेवतेचे व दुस-या अनेक प्रकारच्या देवतांची वर्णने त्यांत आढळून येतात.

 याप्रमाणे अनेक देवदेवता व अनेक दंतकथा यांचा अंतर्भाव संहितांत झाला असला तरी या दंतकथांच्या मुळाशी एक महत्त्वाची गोष्ट विशेषेकरून आढळते हें लक्ष्यांत ठेवण्यासारखे आहे. ती गोष्ट ही की, प्रत्येक देवतेच्या वर्णनांत अनंतत्वाची कल्पना प्राधान्येंकरून गोंविली आहे. या अनंतत्वाचे वर्णन कित्येक स्थळीं आदित्य या शब्दाने केले आहे; आणि दुस-या कित्येक स्थळीं अनेक देवतांच्या गुणांत याही गुणाचे अस्तित्व असल्याचे सांगितले आहे. उदाहरणार्थ, इंद्र ही देवता पहा. इंद्र हा शरीरधारी असून अत्यंत बलवान्, सुवर्णाचें चिलखत घालणारा, आपल्या भक्तांबरोबर अन्नपानादि व्यवहार करणारा, आणि त्यांच्या शत्रूबरोबर लढणारा असा असल्याचे वर्णन आढळते; आणि दुस-या एखाद्या मंत्रांत तो सर्वव्यापी, सर्वशक्तिमान् आणि सर्वद्रष्ट असल्याचेही वर्णन केले आहे. याचप्रमाणे वरुणाचेही वर्णन केले आहे. वरुण हा वातावरणाचा व पाण्याचा अधिपति असल्याचे वर्णन एखाद्या जागी केले असतां, दुस-या प्रसंगी तोच सर्वव्यापी आहे असेही सांगितले आहे. वरुणाचें ज्यांत या दुस-या प्रकारचे वर्णन केले आहे असा एक उतारा मी आपणांस वाचून दाखवितों, ह्मणजे त्यावरून माझ्या ह्मणण्याचे तात्पर्य आपल्या लक्ष्यांत चांगले येईल.
 हा सर्वशक्तिमान् व उंच स्थळी राहणारा देव आपल्या अगदीं संनिध असल्याप्रमाणे आपली सर्व कृत्ये पाहतो. मनुष्ये आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत अशी इच्छा करीत असली तरी देवतांस ती सारीं कळतात. उभा कोण राहतो आणि चालतो कोण व एका स्थलापासून दुस-या स्थली चोरट्यासारखा