पान:विवेकानंद.pdf/302

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


लहानशा खासगी सर्भेत काल आपले पहिले भाषण केलें. भाषण चांगले झाले आणि मलाही तें फार आवडलें. ते पुढेमागे लवकरच चांगले वक्ते होतील, अशी मला खात्री वाटते.
 पुस्तकाचा प्रसार पुष्कळ व्हावा असे वाटत असेल तर हिंदुस्थानांत ती पुष्कळ स्वस्त दरानें विकल्यावांचून गत्यंतर नाहीं. टाईपही मोठा वापरला तर लोक अधिक खुष होतील. आपल्या पुस्तकाची एखादी स्वस्त आवृत्ति काढतां आली तर ती जरूर काढा. आपले पुस्तक याहून लवकर बाहेर याव यास पाहिजे होतें. त्यामुळे एक मोठी संधि आपण गमाविली. पण आपल्या हिंदुत्वाला है अनुरूपच आहे. चोर चोरी करून पळाला ह्मणजे दरवाजे बंद करावयाचे, हें आपलें फार जुनें ब्रीद आहे. ज्या त्या कामांत आमचें हेच चालावयाचें आणि यामुळेच आह्मांस सदोदित नुकसान सोसावें लागतें. वर्ष भर बडबड झाल्यावर तुमचें पुस्तक बाहेर आलें. पाश्चात्य लोक तुमच्या पुस्तकासाठी कल्पांतापर्यंत वाट पाहातच राहतील असा का तुमचा समज आहे? तुमच्या या दिरंगाईमुळें तीन हिस्से गिन्हाईक तरी खचित बुडालें. आपला तो — तो तर तुझ्याहून अधिकच आळशी. त्याची छपाई पाहून मला तर ओकारीच आली. असलें रद्दी काम करतां तरी कशाला ? यापेक्षां पुस्तकें न छापणेंच बरें. असली पुस्तकें लोकांच्या पदरांत बांधणें ह्मणजे त्यांना निवळ फसविणेंच आहे. बेहेत्तर, यापेक्षां पुस्तकें छापूं नयेत आणि विकूंही, नयेत. लोकांना नाहक का फसवावें ?
 मी हिंदुस्थानांत येईन तेव्हां मजबरोबर मि० सेव्हियर त्यांची पत्नी मिस मुल्लर आणि मि० गुडविन इतके येणार आहेत. सेव्हियर हे बहुधा आल्मोरा येथें कायमचेच राहतील. गुडविन संन्यास घेणार आहे. तो मजबरोबर फिरत राहणार आहे. आपली पुस्तकें बाहेर पडली हे खरोखर गुडविनचेच उपकार आहेत. माझी व्याख्यानें त्यानें लघुलेखनानें टिपून घेतलीं, म्हणून आज पुस्तकें तयार करतां आलीं. मी हीं व्याख्यानें त्या वेळेच्या स्फूर्तीने दिलेली होती, त्यांजबद्दल कसल्याच प्रकारची आगाऊ तयारी मीं केली नव्हती. गुडविन आतां मजवरोवर कायमचाच राहणार आहे. तो निवळ वनस्पतींचा आहार घेतो.


विवेकानंद.