पान:विवेकानंद.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



श्रुतींतील तत्त्वज्ञानाची उत्क्रांति.

 जीवात्मा, परमेश्वर आणि अशाच प्रकारच्या दुस-या आध्यात्मिक प्रश्नांचा विचार वेदांत कसा केला आहे, याचें सामान्य निरीक्षण आपणांस करावयाचे आहे. आपण प्रथम संहितांपासूनच आरंभ करू. मंत्र अथवा स्तोत्रे यांच्या एकत्र संग्रहास संहिता असे ह्मणतात. केवळ आर्यावर्तातीलच नव्हे तर सर्व जगांतील ग्रंथांत संहिता हा ग्रंथ प्राचीनतम आहे. त्याच्याही पूर्वीचे असे कांहीं बारीकसारीक लेख कोठे नसतील असे नाहीं; पण त्यांस ग्रंथ असें नांव देता येणार नाहीं. ग्रंथ या नांवास पात्र असा हा जगांतील पहिलाच ग्रंथ होय असें ह्मणावयास हरकत नाही. या ग्रंथांत आर्यांच्या कल्पना, आकांक्षा, चालीरीती इत्यादि अनेक प्रकारची माहिती भरलेली आहे.
 अगदीं आरंभींच आपणांस एक विशेष गोष्ट आढळून येते. ती अशी की संहितांत बहुतेक स्तुतिमंत्र असून त्यांत देवतांची स्तुति केली आहे. या देवताही अनेक आहेत. यांत इंद्र, वरुण, मित्र, पर्जन्य इत्यादि अनेक देवतांची नांवे आढळतात. त्याचप्रमाणे निरनिराळ्या देवतांस निरनिराळ्या प्रकारचे सामर्थ्य होते, अशा प्रकारच्या कथा आणि कल्पनाहि त्यांत जागोजाग आढळतात. एका सपने पाणी अडविल्यामुळे वृष्टि होत नसून इंद्र हा आपल्या वज्राने त्यास मारतो व वृष्टि करतो व पर्जन्याने तुष्ट झालेले लोक नंतर या इंद्राची स्तुति करून हवनीय द्रव्यांनी त्याची पूजा करतात अशा प्रकारच्या कल्पना या मंत्रांत आढळून येतात. इंद्राची पूजा ह्मणजे यज्ञ अथवा हवन हॅच होय. यज्ञांत अग्नि प्रदीप्त करून त्यांत एखाद्या प्राण्याच्या मांसाच्या आहुती इंद्राप्रीत्यर्थ देत असत. त्याचप्रमाणे यज्ञाच्या वेळीं आर्य लोक सोमपानही करीत आणि तोच सोम इंद्रालाही अर्पण करीत. साम नांवाची वनस्पति त्यावेळीं अत्यंत लोकविश्रुत होती असे दिसते; पण ती वनस्पति कोणती याची माहिती आज कोणासहीं नाहीं. त्या वनस्पतीबद्दलच्या माहितीचा मागमूसही आतां उरला नाही. ती वनस्पति पिळली असतां तींतून पांढ-या रंगाचा रस निघतो असे त्या वेळच्या वर्णनावरून आढळून येते. या रसाचे नंतर आसव करीत असत. हे आसव मादक असे, असे त्याच्या