पान:विवेकानंद.pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
डॉ. पॉल ड्यूसन.,,,


( ब्रह्मवादीत लिहिलेला, इ. स. १८९६. )

 आज या गोष्टीला सुमारे एक तप होत आलें. जर्मनींतील सुप्रसिद्ध प्रोफे- सर लॅसन, हे एका अपरिचित भाषेबद्दल एक व्याख्यान देत असतां एक विद्यार्थी तें ऐकत होता. या विद्यार्थ्याचा बाप पायाचा धंदा करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. त्याला आठ मुलें असून आमचा हा विद्यार्थी त्यांपैकींच एक होता. त्या दिवशीं प्रो. लॅसन हे संस्कृत भाषेबद्दल माहिती सांगत होते. या व्याख्यानांला हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यास कांहीं फी द्यावी लागत नसे. युरोपखंडांत संस्कृताचा प्रचार वाढत असला, तरी संस्कृतविद्येचें ज्ञानदान हें गुरूच्या चरितार्थाचें साधन अद्यापि होऊं शकत नाहीं. कदाचित् एखाद्या विश्वविद्यालयानेंच त्या गुरूला हाताशी धरलें, तर मात्र गोष्ट वेगळी.

 संस्कृतविद्येचें बीज ज्या धीर पुरुषांनी प्रथम जर्मनीत नेलें, त्यापैकी प्रो. लॅसन हे जवळजवळ शेवटचेच पंडित होत. हे जर्मन पंडित खरोखरच असामान्य कोटींपैकीं होते असें म्हणणें भाग आहे. आर्यविद्येचा प्रसार जर्मनीमध्यें करण्यांत त्यांना कसल्याही प्रकारचा लौकिक फायदा नव्हता. त्यांचा मोठा फायदा म्हटला, तर त्यांच्या स्वतःच्या शुद्ध आणि निःस्वार्थी अंतःकर- णाचें समाधान हाच. कविकुलगुरु श्रीकालिदास यांच्या अभिज्ञान शाकुंतलाचा कांहीं भाग, प्रो. लॅसन हे त्या दिवशीं सांगत होते. ह्या वेळीं तेथें अनेक विद्यार्थी जमले होते; पण आमच्या या तरुण विद्यार्थ्याइतकें दुसऱ्या कोणाचेंही चित्त त्या विषयाकडे वेधलें गेले नव्हते. नाटकाच्या ज्या भागाचें विवरण पंडित लॅसन करीत होते, तो भाग अत्यंत चित्तवेधक होता खरा; पण ज्या भाषेत ते नाटक लिहिलें गेलें ती भाषा पॉल ड्यूसन याला अधिक चित्तवेधक वाटली. विष- यापेक्षां भाषासौंदर्याचा परिणाम त्याच्या चित्तावर अधिक झाला. युरोपीय पंडितांना अपरिचितपणामुळे या भाषेतील व्यंजने आणि जोडाक्षरें उच्चारण्या- ., सही कठीण जातात आणि तोंडें वेडींवांकडीं करावी लागतात; आणि इतकें करूनही उच्चारांतील बोबडेपणा सर्वथा नंष्टं होत नाहीं; प्रो. लॅसन यांसही ही अडचण होतीच; पण तशा स्थितींतसुद्धां भाषेच्या मूळ गांभीर्याचा
 स्वा. वि. सं. ३ - १८