Jump to content

पान:विवेकानंद.pdf/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


सारें वातावरण आध्यात्मिक विचारांनीं दुमदुमून गेलें आहे. नीति आणि अध्यात्म यांची जन्मदात्री हीच भूमि. आपल्या पशुवृत्तीला एकसारखें चिकटून राहण्याचा यत्न मनुष्य करीत असतां तशाही स्थितीत मध्यंतरी विसाव्याच्या जागा त्याला येथें सांपडतात. ही वृत्ति सोडून तो ' न जायते म्रियते वा कदाचित् ।' अशा पदवीला जात असतां त्याला योग्य मार्गदर्शकही येथेंच भेटतात. सर्व लौकिक सुखांचें माहेरघर असे म्हणण्याचा एक काळ या भूमीत होता. आतां दुःखांचा पेला कांठोकांठ भरून वाहत आहे; तथापि ऐहिक सुखें येथें भरून उरलीं असतां, भर तारुण्याच्या भरांत, यशोदुंदुभि सान्या जगभर दुमदुमत असतां आणि जगांतील सर्व सत्ता या राष्ट्राच्या हाती एकवटली असतां, त्यावेळीही या सर्व पाशांचा उच्छेद करून मायाभ्रमांतून प्रथम बाहेर पडलेले राष्ट्र हेंच. सुख आणि दुःख, सामर्थ्य आणि दौर्बल्य, संपत्ति आणि विपत्ति, हास्य आणि अश्रु, जीवित आणि मृत्यु इत्यादि द्वंद्वांचे परस्परविरोधी प्रवाह उच्छृंखलपणें वाहत असतां अनंत शांति आणि स्थैर्य यांस प्राप्त करून देणारें कर्मसंन्यासाचें तत्त्व प्रथम याच मानवसमुद्रांतून बाहेर पडलें. ज्या भूमीत जीवित आणि मृत्यु यांचीं अगम्य कोडी सोडविली गेलीं, ती भूमि हीच. जन्मभर सुखाच्या मार्गे अड्डाहास करून लागावें आणि हे करीत असतां दु:खांचे पर्वत मात्र डोक्यावर पडावे, हीच मानवी जीविताची चालू स्थिति आहे. असल्या जीवितांत हरघडी प्रत्ययास येणाऱ्या अगम्य कोड्यांस उत्तर याच भूमीतून मिळाले आहे. अशा प्रकारचा प्रयत्न पूर्वी कोठें झालेला नाहीं आणि याहून सरळ उत्तर दुसऱ्या कोठून मिळणारही नाहीं. जन्म होणें हेंच मोठें दुःख आहे आणि जीवितयात्रा ही सत्यवस्तूची छाया मात्र आहे, हा शोध प्रथम येथेंच लागला. धर्माला प्रत्यक्ष आणि व्यवहार्यरूप आहे हें प्रथम याच भूमत निदर्शनास आलें. ज्याप्रमाणे इतर देशांतील स्त्रीपुरुष ऐहिक सुखोप- भोगार्थ संसारसमुद्रांत निःशंकपणें उडया घेतात, आणि आपणाहून अधिक दुर्बल अशा बांधवांवर मनसोक्त अंमल चालवितात, त्याचप्रमाणे अनंतसुखाच्या प्राप्तीकरितां कसल्याही यातनांच्या समुद्रांत स्वतःचा कडेलोट करून घेणारी स्त्रीपुरुषें प्रथम याच भूर्मात पैदा झाली. याच भूमीत मानवी अंतःकरण विस्तार पावत पावत इतकें मोठें झालें कीं, त्यांत केवळ मनुष्येंच मावलीं असें नाहीं, तर पशुपक्षी, झाडेझुडपें आणि दगड यांचाही त्यांत अंतर्भाव झाला. अत्यंत