पान:विवेकानंद.pdf/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
उपोद्वात.

२६३


आणि या सर्वांचा अधिष्ठाता जीवात्मा हाही सर्वत्र एकरूपच आहे. ज्याला त्याच्या भाषेत बोलतां येईल, अशा प्रत्येकाचें म्हणणें काय आहे, हे त्याला पूर्णपणे समजतें. या जगांतील प्रत्येक मानवशाखेत कांहीं स्त्रीपुरुषरत्नें अशा स्वरूपाची आहेत की, त्यांच्या अस्तित्वामुळे परमेश्वराचा आशीर्वाद त्या त्या शाखेला प्राप्त होतो. महाराजा अशोकानें एकदां असें ह्मटले होतें कीं “प्रत्येक भूमीत ब्राह्मण आणि श्रमण आहेत." या शब्दांचें प्रत्यंतर आजही दिसतें.
 ज्या पाश्चात्य भूमींतील अनेकांनी केवळ प्रेमानें प्रेरित होऊन मला आपला ह्यटलें, त्या भूमीचा मी फार ऋणी आहे. असें प्रेम केवळ शुद्ध आणि निःस्वार्थी अंतःकरणांचेच द्योतक आहे. तथापि ज्या भूमीनें मला जन्म दिला तिच्याशीं एकनिष्ट राहणें हें माझें आद्यकर्तव्य आहे. माझ्या देशबांधवांनो, मित्रांनो, जर मला हजारों जीव असते तर प्रत्येक क्षणीं ते सगळे जीव तुमच्या चरणीं अर्पण करून त्यांचें मीं सार्थक केलें असतें.
 हा देह, हें मन आणि हे आध्यात्मिक विचार हे मला केवळ याच देशा- पासून प्राप्त झाले आहेत, आणि जर कोणत्याही कामीं मला यशाची प्राप्ति झाली असेल, तर ती सारी तुमचीच आहे. मित्रांनो, त्या यशाचे मालक तुम्हीच; मी नव्हें. खुद्द माझें असें या जगांत काय आहे म्हणाल, तर दुर्बलता आणि अपशय. अनेक कारणांनी अनेक प्रसंगी चित्त आपल्या मध्यबिंदूपासून घसरतें, याचें कारण मीच. जन्मापासून हजारों सच्चरितांच्या गोष्टी प्रत्यहीं कानावर पडणें हें भाग्य या देशांत प्रत्येकाप्रमाणे मलाही उपलब्ध होत असतां जर माझें हृदय दुबळें झालें, जर त्या गोष्टीपासून शिकावयाचें तें मीं शिकून घेतलें नाहीं तर तो दोष माझाच नव्हे तर कोणाचा ? तो कमकुवतपणा माझाच.
 धन्य ! माझी मातृभूमि धन्य आहे !! जो कोणी या पवित्र भूमीवर उभा राहील - मग तो तिचाच पुत्र असो अगर कोणी परकीय असो- त्याला जगांतील अत्यंत पवित्र आणि अत्यंत उच्च हृदयांतून उद्भवणारे विचारतरंग आपल्या- भोंवतीं घिरट्या घालीत आहेत असा प्रत्यय येईल. मनुष्यत्व म्हणून ज्याच्या जवळ आहे त्याला हा प्रत्यय अवश्य येईल. त्याचें अंतःकरण अवनत होऊन पशुत्वाची बरोबरी पावले असेल तर मात्र गोष्ट वेगळी. आज हजारों वर्षे हीं पवित्र अंतःकरणें पशूंचे देव वनविण्यांत गुंतली आहेत. त्यांनी आपल्या कार्याला आरंभ केव्हां केला हें इतिहास पुराणे सांगू शकत नाहीत. माझ्या मातृभूमीचें