पान:विवेकानंद.pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आर्यावर्ताचा जगाला संदेश.


 (पुढील टिपणें स्वामीजींच्या दफ्तरांत आढळली. त्यांच्या मनांत एक ग्रंथ लिहा- वयाचा होता आणि त्याकरितां त्वांनीं बेचाळीस मुद्द्यांची यादी तयार केली होती: पण दुर्दैव आमचें, की उपोद्घाताच्या समाप्तीबरोबरच ग्रंथाचीही समाप्ति झाली. पुढील टिपणें जशीं सांपडली तशीं दिलीं आहेत.)
 १. पाश्चात्यांना मी पोहोचविलेला संदेश कोणास धीटपणाचा वाटेल; पण माझ्या देशबांधवांना जो संदेश द्यावयाचा आहे तो धीटतर आहे.
 २. अनेक प्रकारांमुळे आश्चर्यजनक अशा पाश्चात्यदेशांत चार वर्षे घालवि ल्यामुळे आर्यभूमीबद्दल माझ्या मनांत अधिक स्वच्छ प्रकाश पडला आहे. यामुळे त्या भूमींतील अंधाऱ्या जागा कमी दिसूं लागून उज्ज्वल भाग अधिक उज्ज्वलतेनें दिसूं लागले आहेत.
 ३. एकंदर पाहणी करतां हिंदुलोक अवनत होत आहेत हे म्हणणें खरें नाहीं.
 ४. अनेक मानवी शाखांचें एकीकरण कसे होईल हे कोडें हिंदुस्थानाप्रमा- णेंच सर्व देशांतही आहे; पण येथे त्याचें क्षेत्र अधिक विस्तृत आहे.
 ५. भाषासौकर्य, एकछत्री राज्य, आणि सर्वोहून विशेषतः धर्म, हीं एकी- करणाची साधनें आहेत.
 ६. इतर देशांत ही एकीकरणक्रिया जबरदस्तीच्या मार्गानें करण्यांत आली आहे. एखाद्या विशिष्ट शाखेचे संस्कार दुसन्या एखाद्या शाखेवर जबरीनें लादा- वयाचे; या जबरीचा परिणाम त्या शाखेचें अकाल तारुण्य, वार्धक्य आणि शेवटीं नाश अशा प्रकारें होत आहे.
 ७. आर्यावर्तीत या कोड्याचे स्वरूप प्रथमपासूनच अत्यंत विस्तृत झाले आहे, आणि या देशाचे उपायही सौम्यपणाचे आहेत. अगदी आरंभापासून दुसऱ्यांच्या चालीरीती आणि धर्म यांबद्दल सहिष्णुता हिंदूंत वसत आहे.
 ८. ज्या ठिकाणी हे कोडें अल्प प्रमाणाचें होतें आणि एकीकरणक्रियेला लागणारें सामर्थ्य मोठें होतें, त्या ठिकाणीं परिणाम असा झाला कीं, देशांतील निरनिराळ्या लहान लहान पण जोमदार शाखांतील जिवटपणा नाहींसा झाला. तो जिवटपणा फक्त त्या सामर्थ्यवान् प्रमुख शार्खेत मात्र राहिला. लहान लहान शाखांचा उपयोग प्रमुख शाखेतील थोड्याशा लोकांनी स्वहितार्थ करून घेतला