पान:विवेकानंद.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
हिंदुस्थान अज्ञानग्रस्त देश आहे काय ?

२४९


विद्यादान केले तर ते कृत्य निःसंशय अधिक पुण्यकारक गणिले जाते. पैशासाठी विद्यादान करणे हे कृत्य पापात्मक समजले जाते. विद्या ही कांहीं वाणसवद्यासारखी दे घे करण्याची वस्तु नाही, असा आमचा समज असल्यामुळे पैशाकरितां विद्यादान करणाराकडे लोक तुच्छतेच्या दृष्टीने पाहतात.”
 "सुधारलेले देश अथवा सुधारणा-संस्कृति-( Civilization ) या शब्दाचा अर्थ तरी काय ?' हा प्रश्न स्वामींनी अनेक देशांतील लोकांस केला. ते सारी अमेरिका फिरले आणि हा प्रश्न येथेही त्यांनी अनेक ठिकाणी विचारिला होता. त्याला कित्येकांनी उत्तर दिलें, “ आह्मी जसे आहों त्या स्थितीला सुधारणा-संस्कृति-( civilization ) ह्मणावे. परंतु या उत्तराने स्वामींचे समाधान झाल्याचे दिसत नाही. एखाद्या राष्ट्राने समुद्रावर वर्चस्व स्थापिलें, पंचमहाभूतांना वश केले, आणि मनुष्याच्या सुखसाधनांची अत्यंत वृद्धि केली तथापि स्वतःवर ताबा चालवितां येणे ही अत्युच्च संस्कृति आहे, ही गोष्ट अशा राष्ट्रांच्या स्वप्नांहि आली नसेल. राष्ट्रांत अशा प्रकारच्या विभूति निमाण होणे ही संस्कृतीची पहिली खूण आहे. ही खूण हिंदु राष्ट्राने आजपर्यंत अनेकावर पटविली आहे आणि सध्याही ते पटवीत आहे. पृथ्वीच्या पाठीवरील दुस-या कोणत्याही देशाने या कामीं आर्यावर्ताची बरोबरी केलेली नाही, असे स्वामीजींचे ह्मणणे आहे. त्यांच्या मताप्रमाणे हिंदुस्थानांत पहिले स्थान आध्यात्मिक उन्नतीस दिले असून दुसरे स्थान ऐहिक श्रेष्ठत्वाचे आहे. "सर्व सृष्टीचा अभ्यास करावयाचा तो सुखसाधने वाढविण्याकरितां नसून सृष्टपदार्थातील परमात्मरूप पाहण्याच्या दृष्टीने करावयाचा," असा हिंदूचा स्वभाव आहे. हिंदूंच्या या संस्कृतिविशेषामुळेच ते अत्यंत सोशिक बनलेले आहेत. दुःखें सहन करण्याला जणं काय मर्यादाच नाहीं असे त्यांस वाटते. दैवाचे अनेक दुर्विलास ते आनंदाने सहन करतात, आपले ज्ञान आणि अध्यात्मिक बल ही पृथ्वींतील सर्व लोकांहून निःसंशय श्रेष्ठ आहेत अशी त्यांस पूर्ण जाणीव आहे. अशाप्रकारची ज्या देशाची आणि लोकांची कुलपरंपरा, तिकडे जवळचे आणि दूरदूरचे संत, महंत आणि तत्त्ववेत्ते धांव घेतात आणि आपले देह तेथे ठेवितात हे योग्यच आहे.
 या व्याख्यानाच्या आरंभी स्वामी ह्मणाले, “मला अनेकांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यांपैकी काहींची उत्तरें मी खासगी रीतीने देईन. पण