पान:विवेकानंद.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


करणाऱ्या पोर्वात्त्यांस सुधारण्यासाठी जे धांव घेतात, त्यांनी स्वतःच्या सांग- ण्याप्रमाणे स्वतः वागून दाखविणें प्रथम अवश्य आहे. या जगांतील राज्याला, मोठेपणाला, मानमरातबाला भुलू नका, या सर्वांना तुच्छ समजा, असे त्यांच्या गुरूचें सांगणें त्यांनी प्रथम पाळिलें पाहिजे.
 शुद्ध नीतिदृष्ट्या विचार करतां हिंदुस्थान हा देश साऱ्या पृथ्वीवरील देशांत अत्यंत नीतिमान् आहे असें भाई विवेकानंद यांचें मत आहे. आज तो देश स्वतंत्र नसला तरी त्यांतील धार्मिकता अद्यापि कायम आहे असे त्यांस निश्चितपणे वाटतें. नीति ह्मणजे काय आणि अनीति म्हणजे काय याची व्याख्या करतांना ते ह्मणाले, “अहंकार ही अनीति आणि विश्वव्यापकपणा ही नीति. हिंदु लोकांच्या दृष्टीनें नीति आणि अनीति यांच्या व्याख्या अशा आहेत." त्यांच्या एकंदर भाषणांतील मुख्य मुद्दा हाच. सान्या व्याख्यानाची इमारत याच पायावर उभारली गेली होती. त्यांच्या भाषणाचा विषय हाच होता असे झटलें तरी चालेल. हिंदूंचें ह्मणणें असें आहे कीं, “स्वतःकरितां घर बांधणे आपलपोटेपणाचें- अहंकाराचें - चिन्ह आहे, म्हणून ते कृत्य अनी- तीचें आहे. अतिथींची सोय व्हावी आणि परमेशपूजन व्हावें याकरितां घर बांधावें. स्वतःकरितां अन्न शिजविणें हें पापमूलक आहे. 'देवद्विजां अनि अन्न जें उरे । तें शेष सेवी मग पाप त्या नुरे ॥ ते पापिये केवळ पाप भक्षिती । आत्मार्थ जे पाक अनेक निर्मिती ॥' याकरितां अन्न शिजविणें तें अन्नार्थी लोकांकरितां शिजवावयाचें असा हिंदूंचा समज आहे. जर एखादा अतिथी दारापाशी आला तर हिंदु प्रथम त्याला जेवूं घालील आणि नंतर आपण खाईल. हिंदूंचा हा स्वभाव तुम्हांला पेशावरपासून कन्याकुमारीपर्यंत एकसारखा आढळेल. कोणत्याही घरापाशीं तुम्ही गेलां तरी ओली कोरडी भाकर आणि आंग आडवें करण्यापुरती जागा हीं तुम्हांला अवश्य मिळतील. "
 " जातिभेद आणि हिंदुधर्म यांचा एकमेकांशी अर्थाअर्थी संबंध नाहीं. प्रत्येक मनुष्याचा धंदा वंशपरंपरेनें ठरलेला असतो. सुताराचा मुलगा सुतार, सोनाराचा सोनार, आणि भिक्षुकाचा भिक्षुक."
 "प्राणदान आणि विद्यादान यांचे महत्त्व हिंदूंच्या दृष्टीने फार मोठे आहे. तथापि त्या दोहोंतही विद्यादान अधिक पुण्यकारक गणिले आहे. कोणीं एखाद्याचा जीव वांचविला तर तें कृत्य पुण्यकारक तर खरेंच; पण कोणी