पान:विवेकानंद.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
मानवी मनाचें सामर्थ्य.

२४३


गोष्टी नव्हत. भौतिकशास्त्रांनाही जर ही गोष्ट लागू आहे, तर मानसशास्त्राला तर ती विशेषच लागू असली पाहिजे. तथापि असलें सामर्थ्य अंगीं आणणें म्हणजे कांहींच कठीण नाहीं असें पुष्कळांस वाटत असतें. एखाद्याला पोटापुरते चार पैसे मिळवायला किती मेहनत करावी लागते ? धनवान् होण्याला किती प्रयास पडतात ? या गोष्टींचा कांहीं विचार करा. एखाद्याला विद्युत्शास्त्राचा अभ्यास करावयाचा असला अथवा कोणाला एंजिनिअर व्हावयाचें असले तर केवढी मेहनत करावी लागते ! पाठशाळेतील शिक्षण संपल्यानंतरही जन्मभर या कलांचा अभ्यास करावा तेव्हां त्यांत पारंगतता प्राप्त होईल.
 बहुतेक भौतिकशास्त्रें ज्या वस्तूंचें विवेचन करतात त्या वस्तू जडरूपाच्या असतात. एका प्रकारें त्या स्थावर वस्तू असतात. त्यांच्यावर तुम्ही कितीही आणि कसलेही प्रयोग करून पाहिले तरी त्यांच्याकडून कांहीं विरोध व्हाव- याचा नाहीं. एखादी खुर्ची तुम्हीं फोडून तोडून तिचें कणशः पृथक्करण केलें, तरी ती कांहीं नको म्हणणार नाहीं अथवा पळूनही जाणार नाहीं. पण या शास्त्राचा विषय म्हणजे मन; आणि मन हें वान्याइतकेंच स्थिर ! त्याला जरा स्पर्श करावयाची खोटी कीं तें काशीहून निघतें तें थेट रामेश्वर गांठतें! आतां आनंदाच्या शिखरावर आणि क्षणांत दुःखाच्या डोहांत ! सदासर्वदा त्याचे रंग न्यारेच. अशा स्थितीत तें असतां त्याचा अभ्यास करावयाचा, त्याच्या साऱ्या वृत्तींची छाननी करावयाची आणि त्याचें नियमनही करावयाचें ! मग या शास्त्राचा अभ्यास कितपत सोपा असेल तें तुम्हींच ठरवा. या शास्त्राचा अभ्यास सदोदित कात्रीच्या दोन पात्यांत राहून केला पाहिजे. जरा इकडे तिकडे अंग हालविण्याची सोयं नाहीं. मला शेंकडों लोक एक प्रश्न विचारीत असतात कीं, तुम्ही अभ्यासाचा मार्ग कां दाखवीत नाहीं? त्यांना उत्तर इतकेंच कीं 'महाराज, ही चेष्टेची गोष्ट नाहीं. या मार्गावर आरूढ होणें म्हणजे चमचमीत मिष्टान्न भक्षण नव्हे. मी भाषणें करतों, आपण ती ऐकतां आणि घरी जातां. दुसऱ्या दिवशीं पहावें तो वक्ता आणि श्रोता दोघेही आपापल्या ठिकाणीं परीटघडी सारखे कोरे. मग तुम्ही म्हणतां “ यांत कांहीं तथ्य दिसत नाहीं ". याचें कारण पाहूं गेलें तर इतकेंच की त्यांत कांहीं 'तथ्य' पाहण्याची इच्छाच नसते. मला या शास्त्रांतली कांहीं विशेष माहिती आहे असें नाहीं. आहे ती अगदीं पुसट पुसट आहे. पण ही तुटपुंजी माहिती आपलीशी करून घेण्यास या आयुष्याची