पान:विवेकानंद.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


 या सर्व प्रकारच्या अभ्यासांच्या मुळाशीं एकच हेतु होता. कोणत्या तरी रीतीनें वस्तुमात्राच्या सूक्ष्मरूपाचें शोधन करणे हाच हेतु या अभ्यासांत होता. यांपैकीं कित्येकांनी विलक्षण सामर्थ्य खरोखरच प्राप्त करून घेतलें होतें. कित्येकांनी हवेत उडण्याचा यत्न केला. एका पाश्चात्य पंडितानें मला सांगितलेली एक गोष्ट ऐकण्याजोगी आहे. ही गोष्ट त्याला ज्याने सांगितली तो गृहस्थ एका काळ सिलोनचा गव्हर्नर असून त्यानें ती प्रत्यक्ष पाहिली होती. एकावर एक आडवे ठेवलेले असे कांहीं लांकडाचे तुकडे रचून च्यावर एक सपाट फळी ठेविली होती, आणि त्या फळीवर एका मुलीला मांडी घालून वसविण्यांत आले होतें. कांहीं वेळ त्या मुलीला तेथें बसवि- ल्यानंतर एक मनुष्य आला आणि त्याने फळीखालचे लांकडाचे तुकडे हळु हळु काढण्यास सुरवात केली. शेवटी त्यानें सर्व तुकडे काढून घेतले तरी मुलगी तशीच फळीवर बसली होती आणि ती फळी हवेंत अधांतरीं तरंगत होती. यांत कांहीं तरी कपट असावें असें गव्हर्नर यास वाटून त्याने आपली तरवार झपाट्यानें त्या मुलीच्या बैठकीखालून फिरविली. पण मुलीच्या बैठकीखाली कांहीं घट्ट पदार्थ असल्याचे आढळून आलें नाहीं. ही गोष्ट अनेक लोकांच्या नजरेसमोर घडून आली असल्यानें अविश्वसनीय मानतां येत नाहीं. मग हें काय असावें असा प्रश्न सहजच उपस्थित होतो. ही कांहीं तरी जादू असावी काय ? ही जादूही नव्हे आणि अजंब करणीही नव्हे. चकित होण्याजोगें असें यांत कांहींसुद्धां नाहीं, हीच यांतली लक्ष्यांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे. अशा गोष्टी घडणे अशक्य आहे असें एकही हिंदु तुम्हांस ह्मण- णार नाहीं. हिंदूंना या गोष्टीचें कांहींच कौतुक वाटत नाहीं; इतक्या त्या त्यांच्या आंगवळणी पडल्या आहेत. एखाद्या शत्रूबरोबर लढाई झाली तर पूर्वीचे हिंदु असें म्हणत कीं, एखादा योगी येऊन या साऱ्या शत्रूंची धुळदाण उडवून देईल. हा विश्वास साऱ्या हिंदूंच्या हाडींमासी खिळून गेलेला आहे. नुसत्या तरवारींत काय सामर्थ्य आहे ? सामर्थ्याचें वसतिस्थान जीवात्मा हेच आहे असा आम्हां हिंदूंचा पक्का विश्वास आहे.
 आतांपर्यंत केलेले विवेचन बरोबर असेल तर या दिशेनें प्रयत्नांची शिकस्त करून पाहण्याच्या योग्यतेचें हैं शास्त्र आहे यांत संशय नाहीं. पण कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करून त्यांत पारंगतता संपादन करणे म्हणजे शिळोप्याच्या