पान:विवेकानंद.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड]

वेदान्त आणि मानवी संस्कृति.

१५

तमुक करू नये अशा प्रकारच्या केवळ विधिनिषेधक वचनांनी हिंदूचे केव्हांही समाधान झालेच नाहीं.
  आत्मा हा केवलरूप ( Absolute ), सर्वव्यापी, सर्वांतरात्मा आणि अनंत आहे असा हिंदूचा सिद्धांत आहे. अनंत अस्तित्वे एकाहून अधिक असणे शक्य नाही. ज्याला कोठेही आणि कसल्याही प्रकारचा अंत नाहीं असे अस्तित्व एकच असले पाहिजे. कारण अशीं अस्तित्वे दोन आहेत असे मानले तर तीं परस्परांस मर्यादित करतील आणि यामुळे ‘अनंत' या संज्ञेस तीं पात्र राहणार नाहीत हे उघडच आहे. यासाठी अनंतत्व एकच आहे असा अद्वैताचा सिद्धांत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक देहांत निराळा ह्मणून भासमान होणारा जीवात्मा हाही अनंत परमात्म्याचा अंश आहे. याकरिता परक्याला पीडा देणे ह्मणजे स्वतःलाच दुखविण्यासारखे झालें नाहीं काय? एकंदर नीतितत्त्वांच्या मुळाशी हाच सिद्धांत ग्रथित असल्याचं तुह्मांस आढळून येईल.
 मनुष्य आपल्या जीवनक्रमांत अनेक प्रकारच्या चुका करीत असतो व अशा रीतीने चुका करता करता त्याला अखेरीस सत्य सांपडते असा पुष्कळांचा समज आहे. मनुष्याचा मार्ग खोट्यांतून खच्याकडे जाण्याचा आहे असा या लोकांचा समज असतो; कारण कोणताहि मनुष्य जेव्हा एखाद्या नव्या कल्पनेचे ग्रहण करतो तेव्हां पूर्वीच्या कल्पनेचा त्याग तो अवश्य करतोच असे त्यांचे ह्मणणे आहे. पण हा समज चुकीचा आहे. असत्याला सत्याचा मार्ग केव्हाही दाखविता येणार नाही. असत्य ते चिरकाल असत्यच. त्याची सत्याशी भेट होणे शक्य नाहीं. जीवात्मा आपल्या मूलरूपाकडे धाव घेत असतां वाटेत अनेक ठिकाणी मुक्काम करतो. त्याच्या मुक्कामाच्या अनेक जागा आहेत. व प्रत्येक मुक्कामावर थोडा वेळ विश्रांति घेऊन तो आपला मार्ग आक्रमण करतो. यांत अमुक मुक्काम खरा आणि दुसरा खोटा असा भेद मानणे चुकीचे आहे. सर्व मुक्काम त्यास सारखेच उपयुक्त असल्यामुळे सर्वच खरे आहेत. या करितां मनुष्य खोट्यांतून खच्याकडे प्रवास करीत नसून अंधुक प्रकाशांतून अधिक प्रकाशांत-एका प्रकारच्या सत्यापासून दुस-या प्रकारच्या सत्याकडेप्रवास करीत आहे असे समजावें. उहाहरणार्थ, आपण असे ससजू की एक मनुष्य सूर्याकडे प्रवास करीत असून निरनिराळ्या मुक्कामांवरून तो त्या