पान:विवेकानंद.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


येतेंच. आपल्या सर्व प्रकारच्या उद्योगांत हेच तत्त्व आपण लागू करीत असतो. कृत्रिमरीत्या व्यवहारांतील सर्व वस्तूंची वाढ झपाट्याने करण्याचा आपला यत्न अव्याहत सुरू आहे. मग जी गोष्ट आपणांस झाडांच्या बाबतींत आणि इतर बाबतींतही साध्य होते, तीच गोष्ट मनुष्याच्या ठिकाणी कां साध्य होऊं नये ? अवश्य होईल. अशाच रीतीनें मानवकुलांतील एका सबंध शाखेची उत्क्रांति झपाट्यानें करतां येईल. मानवकुलांतील सद्गुरू गांवोगांव आणि देशोदेश कां फिरतात ? याचें कारण हेंच कीं, अशाने एखाद्या सबंध शाखेची उत्क्रांति शक्य होते. अशाच रीतीनें एका एका व्यक्तीची उत्क्रांति अधिक जलद होईल काय ? होय, अवश्य होईल. उत्क्रांतीच्या गतीला कांहीं अमुक मर्यादा आहे असें नाहीं. एखाद्या मनुष्याची वाढ साच्या आयुष्यांत अमुक एका मर्यादेपर्यंतच व्हावी आणि त्याच्या पलीकडे ती जाऊंच नये असा कांहीं नियम नाहीं. एक मनुष्य पूर्णावस्थेच्या किती जवळ जाईल हें ठरवि- ण्याचें माप आपणांस कोणीं दिलेले नाहीं. त्याच्याभोवती तशी अनुकूल परिस्थिति असेल तर जीवनक्रमाच्या एखाद्या लहानशा अवधतही तो चम- त्कार करून दाखवील. आपली अखेरची मर्यादा एकच. तेथे पोहोचल्यावर मात्र वाढ खुंटेल. ती मर्यादा ह्मणजे पूर्णत्व हीच. असो. या उपपत्तीचा एकंदर मथितार्थ हा की अत्यंत पूर्णावस्थेला पोंहोंचलेला मनुष्य - एकंदर शाखेचा रस्ता प्रकाशित करणारा उज्ज्वल दीप- निर्माण करण्यास सामा- न्यतः जर एक लक्ष वर्षे लागतील असे मानले तर त्या शाखेची उत्क्रांति झपाट्यानें झाल्यास, असा मनुष्य त्या शाखेत आजच निर्माण होईल. सर्व योग्यांचें ह्मणणें हेंच आहे. जगांत जे महात्मे आणि धर्मप्रवर्तक आजपर्यंत होऊन गेले ते याच जातीचे दीप होते. लक्षावधि मनुष्यांची उत्क्रांति हो- ण्याची वेळ आल्याबरोबर त्यांचा रस्ता या उज्ज्वल दीपांनीं प्रकाशित झाला. एकाच आयुष्यांत पूर्णत्व पावलेली माणसें हींच. जगाच्या साद्यंत इतिहासांत असे अवतार सर्वत्र आणि सर्व काळी जन्मास आले आहेत. फार लांब कशाला, परवांच एक मनुष्य असा होऊन गेला कीं, साऱ्या मनुष्यजातीनें एका आयुष्यांत जी कर्तबगारी केली असती ती त्यानें एकट्यानें एकाच आयुष्यांत-याच चालू आयुष्यांत - करून दाखविली. आतां येथें हेंही अवश्य लक्ष्यांत ठेवले पाहिजे कीं, ही वाढसुद्धां कायद्यास अनुसरूनच होत असते.