पान:विवेकानंद.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
मानवी मनाचें सामर्थ्य.

२३७


वाढत जाते तसतसे त्या शाखेची विशिष्ट पद्धतीची वाढ त्याच्या ठिकाणीं दिसूं लागते; व शेवटीं त्याचें स्वरूप म्हणजे साऱ्या शाखेच्या संकलित रूपाची लहानशी प्रतिमाच होऊन बसते. शाखेला जी स्थिति प्राप्त करून घेण्याला हजारों वर्षे लागली तीच स्थिति, त्या व्यष्टीनें थोड्याशा वर्षांच्या अवर्धीत प्राप्त करून घेतली. हा सिद्धांत आपण चांगला ध्यानांत घ्या; म्हणजे जें मी पुढें सांगणार आहे तें आपणांस बरोबर समजेल. आतां सगळे मानवकुल ही एकच शाखा आहे अशी कल्पना करूं; अथवा सर्व जीवजाति ही एक शाखा आहे असे म्हणूं. या जगांत जितक्यांना जीव आहे मग तो मनुष्यप्राणी असो अथवा पशु असो- त्या सर्वांची मिळून एकच शाखा आहे अशी कल्पना करूं. ही सारी शाखा-समष्टि- एका विशिष्ट साध्याकडे धांव घेत आहे. तें साध्य म्हणजे पूर्णत्व हेंच होय. सर्व जग कोणत्या साध्याकडे धांव घेत आहे हैं कांहीं स्त्रीपुरुषांच्या लक्ष्यांत आगाऊच आलेलें असतें. अशीं मनुष्यें इतरां- करितां वाट पाहात बसत नाहीत. पुनःपुनः जन्म घेण्याचा त्यांस कंटाळा आलेला असतो. सर्व मनुष्यजात मुक्तावस्थेस पोहोचेपर्यंत थांबण्यास त्यांना अवकाश नसतो. यामुळे अशीं स्त्रीपुरुष धांवपळ करूं लागतात, आणि जें अंतर 'चालून जाण्यास साऱ्या मनुष्यजातीस लक्षावधि वर्षांच्या काळ लागणार, तेंच अंतर तीं थोडयाशा वर्षांच्या अवधीत चालून जातात. जर एखाद्या लहानशा बेटावर अगदीं रानटी स्थितींतली अशी कांहीं मनुष्य नेऊन सोडली व त्यांना जगण्यापुरतें मात्र अन्न वस्त्र मिळेल अशी व्यवस्था केली तर कालंगतीनें आपली स्थिति ती आपणच सुधारूं लागतील व कांही विशिष्ट प्रकारची समा- जरचना तयार करतील. अशा रीतीनें अगदीं रानटी अवस्थेतील ही मनुष्यांची टोळी केवळ स्वबळानें संस्कृतावस्था निर्माण करील. आतां अशा स्थितींतल्या मनुष्यसंघाला कांहीं विशेष प्रकारची मदत मिळाली तर त्याची वाढ अधिक लवकर होईल हे उघड आहे; झांडाच्या वाढीलाही अशा रीतीनें आपणांस मदत करतां येते हा तर आपला सामान्य अनुभव आहे. झाडांना कोणत्याही प्रकारचें खत वगैरे घातलें नाहीं आणि त्यांची कांहीं विशेष जोगवण केली नाहीं तर तीं वाढावयाचीं थांबतात असें नाहीं. केवळ नैसर्गिकपणे त्यांची वाढ होणारच; पण त्याला अवधि लागणार हे उघड आहे. उलटपक्षी त्यांच्या वाढीला आपण कांही हातभार लावला तर ती लवकर वाढतात याचें प्रत्यंतरही आपणांस