पान:विवेकानंद.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


जडशास्त्रांनीं सिद्ध केले आहेत; पण त्यांहून त्यांचें दुसरें सूक्ष्मस्वरूपही आहे हैं आपणांस आतां निश्चितपणें ठाऊक झाले आहे. वास्तविकपणे जडविश्व, सूक्ष्मविश्व, अंतःसृष्टि इत्यादि भेदच खोटे आहेत. हे केवळ शब्दभेद आहेत. जें कांहीं आहे तें एकच आहे. "सर्व खल्विदं ब्रह्म" हा सिद्धांत आतां आप- णांस अवगत झाला आहे. आपल्या अस्तित्वाला कशाची तरी उपमा सम- जुतीसाठी द्यावयाची म्हटले तर त्याला शंकूची उपमा देतां येईल. शंकु मुळाशीं अत्यंत रुंद आणि जड असतो व शेवटाकडे निमुळता होत जाऊन शेवटीं केवळ बिंदूसारखा होतो. आपला जडदेह हा या शंकूच्या तळासारखा आहे. त्यापुढे तो निमुळता होत जातो. त्याचें स्वरूप त्यापुढें निरुंद होत जातें, आणि शेवटीं जें बिंदुवत् अस्तित्व असतें, त्याला आपण जीवात्मा ( Spirit ) म्हणतों. ही रचना ज्याप्रमाणे एका पिंडांत अनुभवास येते त्याचप्रमाणे ती ब्रह्मांडांतही असते. 'जे पिंडी तेंच ब्रह्मांडी' हा सिद्धांत आपणांस ठाऊक आहेच. ब्रह्मांडरचनाही याच नमुन्याबरहुकूम रचली गेली आहे. केवळ जडविश्व हा विश्वशंकूचा तळांतील भाग असून तो पुढें निरुंद होत जातो; आणि शेवटी जें, विश्व अत्यंत सूक्ष्मरूप उरतें, त्याला आपण ईश्वर असे म्हणतों.
 एखाद्या वस्तूंत जें कांहीं सामर्थ्य आपल्या प्रत्ययास येतें, तें त्या वस्तूंतील जडरूपांत नसून तिच्या सूक्ष्मरूपांत असतें. बाह्यतः जड भाग हालचाल करतांना दिसला तरी ती हालचाल ज्या शक्तीमुळे होते ती शक्ति त्या वस्तूच्या सूक्ष्म रूपांतर्गत असते. एखादा मनुष्य मोठें ओझें उचलतो त्यावेळी त्याच्या हाताचे स्नायू फुगलेले दिसतात. त्याच्या एकंदर शरिरांत त्यावेळी हालचाल सुरू झालेली असते. शरिरांतील स्नायूंत केवढी मोठी शक्ति आहे असें त्यावेळीं आपल्या मनांत येतें. पण खरोखर पाहिले तर हें सामर्थ्य स्नायूंचें नसून आंतील ज्ञानतंतूंचें असतें. ज्ञानतंतूंचे गुप्त सामर्थ्य स्नायूंच्या द्वारे प्रत्यक्ष रूपानें प्रकट होतें. यांपैकी एखादा ज्ञानतंतु नष्ट झाला तर त्या भागांतील सामर्थ्यही नष्ट होतें असा अनुभव आहे. आतां ज्ञानतंतूंत जें सामर्थ्य असतें त्याहूनही अधिक सूक्ष्म अशा स्वरूपाच्या वस्तूंतून आलेले असतें. ही अधिक सूक्ष्म वस्तु म्हणजे विचार हीच आहे. अत्यंत सूक्ष्मरूप हेच शक्तीचे अधिष्ठान आहे. शक्ति जडवस्तूंच्याद्वारें कार्यकारी झाली म्हणजे आपणांस दिसूं लागते; आणि ती सूक्ष्मरूपांत असली म्हणजे आपणांस दृग्गोचर होत नाहीं. स्थूलवस्तु हालचाल करूं लागली म्हणजे