पान:विवेकानंद.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


जेथें जातील तेथें यशस्वी होतीलच. ज्याच्यांत कांहीं विशिष्टत्व - असामा- न्यत्व निर्माण झाले आहे असा मनुष्य कसल्याही धंद्यांत पडला तरी आपल्या विद्युत्शक्तीनें भोंवतालीं चैतन्य उत्पन्न करून सर्वत्र यश संपादील.
 आतांपर्यंत सांगितलेल्या सर्व गोष्टी आपणा सर्वाच्या सामान्य अनुभवां-- तल्या आहेत. तथापि या गोष्टी अमुक अमुक नियमान्वयें घडतात असे मात्र सांगतां यावयाचें नाहीं. सगळ्या जडशास्त्रांचे नियम आपण पालथे घातले तरी त्यांत हे नियम सांपडावयाचे नाहींत. हायड्रोजनचे परमाणु घ्या, आक्सिजनचे घ्या आणि त्यांत वाटेल तर कार्बन मिसळा. त्यांत हें व्यक्ति- विशिष्टत्व सांपडावयाचें नाहीं. हें व्यक्तिविशिष्टत्व कांही औरच आहे. आपली सारी शास्त्रें येथें लंगडी पडतात; तथापि या गोष्टी कांहीं काल्पनिक आहेत असें नाहीं. आपल्या डोळ्यांसमोर त्या प्रत्यही घडत आहेत. त्यांवरून आपली पक्की खात्री होते की मनुष्यांत हालचाल करणारें त्याचें विशिष्टत्व हेच आहे.. लोकांवर वजन पाडणारेंही हें विशिष्टत्वच होय. हेंच विशिष्टत्व सदोदित कार्य करीत असतें आणि ते करीत असतां दुसऱ्यांच्या हृदयाला चटका लावून आपण निघून जातें. तें निघून गेलें म्हणजे मागें ज्या त्याच्या खुणा शिल्लक उरतात त्यांना बुद्धि वगैरे नांवें आपण देतो. त्यांनी लिहिलेले ग्रंथ हेही त्या विशिष्ट- त्वाच्या खुणांसारखेच आहेत. त्यांवरून आपणांस त्या विशिष्टत्वाबद्दल पुसट पुसट कल्पना मात्र आहेत. आतां आणखीही कांही उदाहरणें पहा. जगांत ज्यांनी प्रत्यक्ष धर्मकार्य केले ते महात्मे आणि ज्यांनीं मोठमोठे महत्वाचे ग्रंथ लिहिले ते पंडित, यांची तुलना करून पाहिल्यास आपणांस एक गोष्ट विशेषेकरून आढळून येईल, ती ही कीं, पंडितांनी मोठमोठे ग्रंथ निर्माण केले ही गोष्ट खरी; पण आपल्या साया हयातीत मूठभर लोकांतील तरी चैतन्य त्यांनी जागृत केलें असे आढळावयाचें नाहीं. उलट पक्षी महत्म्यांनीं ग्रंथ लिहून ठेवले नसले तरी देशचेदेश त्यांच्या हयातीत त्यांच्या मागें धांवत होते. याचे कारणही त्या त्या व्यक्तीतील विशिष्टत्व हेंच होय. तत्त्वदशीं पंडितांतील विशिष्टत्व अंधुक असल्यामुळे त्यांजकडे कोणाची मनें फारशी ओढलीं गेलीं नाहींत, आणि उलट पक्षीं महात्म्यांचें विशिष्टत्व तेजोमय असल्यामुळे लक्षावधि लोक पतंगासारखे तेथें येऊन पडले. पंडितांतील सारें विशिष्टत्व त्यांच्या बुद्धींत अवतरलें होतें. यामुळे आपली व त्यांची भेट होते.