पान:विवेकानंद.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
मानवी मनाचें सामर्थ्य.

२२७


अवश्य लक्ष्यांत बाळगली पाहिजे, ती ही कीं, खोटें झालें तरी तें खऱ्याची नक्कल असतें. मुळांत कांहीं खरें असेल तरच त्याच्या नकला उत्पन्न होणार! ज्याला मुळांतच अस्तित्व नाहीं अशा एखाद्या घटनेची नक्कलतरी कशी निप- जेल ? अशा अनेक नकला होतात यावरूनच त्यांत कोठेंतरी सत्यांश असला पाहिजे, हैं उघड दिसतें. एका खऱ्याबरोबर शेंकडों नकला पिकत असतील; पण मुळांत एकतरी खरे असले पाहिजे ना ?
 हजारों वर्षांपूर्वी असले प्रकार हिंदुस्थानांत हंमेश घडत असत. किंबहुना सध्यापेक्षां त्यावेळींच हे चमत्कार अधिक घडत असत. माझा एक असा समज आहे, की एखाद्या देशांत लोकसंख्या फार वाढली म्हणजे त्या देशांतील आध्यात्म- बल कमी होतें. मनुष्यें थोडी आणि देशाचा विस्तार मोठा असे असले म्हणजे त्या ठिकाणी आध्यात्मबलही अधिक असावे असे मला वाटतें. चमत्कारिक दिस- णाऱ्या प्रत्येक गोष्टीचें संशोधन व पृथक्करण करून त्याच्या मूलभूत सिद्धांतांस पोहोचावयाचें अशी हिंदूंची पूर्वापर पद्धत असल्यामुळे असल्या प्रकारांच्या मुळांशी काय आहे, याचाही शोध लावण्याचा यत्न त्यांनी केला. हा शोध करतांकरतां अनेक महत्त्वाचे सिद्धांत त्यांनी शोधून काढिले. याचा अर्थ इत काच की असल्या चमत्कारांचा मुळापर्यंत शोध लावून त्यांनी त्याचें एक सर्वोगपूर्ण असे शास्त्र बनविलें. यांतील कित्येक गोष्टी सामान्य मनुष्याच्या नजरेनें चम- त्कारिकशा भासल्या, तरी त्या नैसर्गिक नियमांस सोडून घडत नाहींत, ही गोष्ट या पूर्वीच्या शोधकांच्या लक्ष्यांत आली होती. अलौकिक अथवा निसर्गबाह्य अशी एकही गोष्ट या विश्वांत घडून येत नाहीं. ज्याप्रमाणे आपल्या सामान्य व्यावहारिक गोष्टी निसर्गसिद्ध नियमांस अनुसरून घडतात, त्याचप्रमाणें हे चमत्कारही त्याच नियमांनी बांधलेले आहेत. सामान्य सृष्टिरचना जशी नियमबद्ध आहे, त्याचप्रमाणे ही चमत्कारांची सृष्टीही नियमबद्ध आहे. एखाद्या मनुष्याला जन्मतःच कांहीं विशेष सामर्थ्य असले, तर त्याला घड- वितांना ब्रह्मदेवानें कांहीं विक्षिप्तपणा केला असेल असे वाटण्याचें कारण नाहीं. असल्या चमत्कारांचा सांगोपांग अभ्यास करून ते करण्याचें सामर्थ्य आपल्या अंगी आणणे अशक्य नाहीं. कोणालाही हें साधण्याजोगे आहे. या शास्त्राला त्यांनी राजयोग असें नांव दिले आहे. या शास्त्राचा अभ्यास कर- णारे हजारों लोक हिंदुस्थानांत आहेत; इतकेंच नव्हे, तर साऱ्या राष्ट्राच्या