पान:विवेकानंद.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

तृतीय


 स्वतःच्या पौरुषाबद्दल कित्येक वेळां आपण बढाया मारीत असतो. त्यावेळीं आपण ह्मणजे प्रतिपरमेश्वर असे आपण भासवीत असतों. 'मला सर्व कांहीं समजतें; मी वाटेल तें करूं शकेन; मी शुद्ध-निर्दोष आहे; मी निष्कलंक आहे; या जगांत स्वार्थत्यागी कोणी असेल तर तो मी.' असल्या प्रकारची अघळपघळ भाषा आपण नित्य वापरीत असतो; पण त्याचक्षणीं एखादा लहानसा खडा कोणीं फेंकला, तर तो तोफेच्या गोळ्याहूनही आपणांस अधिक इजा करतो. एखाद्या पोराचें लहानसें बोट लागले, तर आपणास जखम झाल्यासारखें वाटतें. जगांतील वाटेल त्या मूर्खाने यावें आणि आमच्या शांतीचा भंग करावा, इतकी तर आपल्या 'ईश्वरत्वाची ' किंमत आपण बाळ- गतो. आमची मनें इतकीं भोळी असल्यावर यत्किंचित् आघातानें तेथें दुःखाची उत्पत्ति व्हावी यांत नवल काय ? अशा स्थितीत जगाला नांवें ठेव- ण्यांत काय बरें फायदा आहे ? आपल्या खोड्यांनी परमेश्वराच्या शांतीचा भंग आपणांस कधीतरी करतां येईल काय? जर तुम्ही खरोखर परमेश्वर- स्वरूप असाल, तर तुमच्या शांतीचा भंग कशानेंही होतां उपयोगी नाहीं. जगाच्या हातून तुमचें कांहींच वांकडे होणार नाहीं. तुम्ही एखाद्या नरकाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेलां, तरी तुम्हांस च होणार नाहीं; पण खरी गोष्ट वेगळीच आहे. तुम्ही कितीही बढाया मारिल्या, तरी जोपर्यंत जगापासून तुम्हांस दुःख होतें असें वाटत आहे, तोपर्यंत पर- मेश्वरत्वाची तुमची सारी बडवड म्हणजे निवळ धुराचे ढग ! बाह्यजग आप- णांस इजा करतें या भावनेने तुम्हीं मात्र स्वतःस अनेक दुःखांस पात्र करून घेतां. एका दुःखांतून तुम्ही सुटतां न सुटतां, तोंच दुसऱ्याच्या जाळ्यांत सांपडतां. ‘अरेरे ! काय हें जग दुष्ट ! हा मनुष्य मला दुःख देतो; तो मनुष्य माझे कान उपटतो, आणि तिसरा कांहीं तिसरीच खोडी करतो.' अशा तक्रारी करणें स्वतःच्या मूर्खपणाला असत्याची जोड देणें आहे. यामुळे दुःख द्विगुणित मात्र होईल.
 या जगांत ज्याची त्यानेंच काळजी घेतली पाहिजे. आपल्या हातीं इतकेंच आहे. दुसरा कोणी तुम्हास सुख अथवा दुःख देत नाहीं. "सुखस्य दुःन कोऽपि दाता । परो ददातीति कुबुद्धिरेषा ॥ अहंकरोमीति वृथाभिमानः । स्वकर्मसूत्रप्रथितो हि लोकः || याकरितां परक्याबद्दलचा कांहींच विचार