पान:विवेकानंद.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
कर्मरहस्य.

२२१


 एखादें दुःख प्राप्त झाले की आपला पहिला यत्न बाह्यकारण शोधून काढण्याचा असतो. ही संवय आपणांस लहानपणापासून जडली आहे. आपल्या अपयशाचें खापर कोणाच्या बोडक्यावर फोडतां येईल, हेंच आपण प्रथम शोधूं लागतों. मग आपली खटपट लोकांची सुधारणा करण्याकरितां सुरू होते. आपली स्वतःची कांहीं चूक असेल असे आपल्या स्वप्नींही येत नाहीं. जो काय अपराध असेल तो सारा दुसऱ्यांचा. त्यांना अगोदर सुधारलें- पाहिजे. आपण खरोखरच शुद्ध घमंडानंदन असतो. आपणांस कांहीं दुःख प्राप्त झाले ह्मणजे प्रथम बोलावयाचें तें हेंच, 'काय हो, जग कितीतरी दुष्ट आहे !' मग लोकांना शिव्याशाप देऊन ह्मणावयाचें, 'यांच्यासारखे गाढव मीं कोठेंही पाहिले नाहींत.' पण शहाण्याच्या कांद्यानों, जर तुझी खरोखर शहाणे आहां, तर असल्या दुष्ट जगांत राहतां कशाला ? जर या जगांत सर्वत्र राक्षसांची आणि दैत्यांची वस्ति असेल, तर आपण स्वत:ही त्यांपैकीच एक दैत्य नव्हे काय ? ' या जगांतले सारे लोक शुद्ध आपलपोटे. " खरें आहे. अगदीं निर्भेळ सत्य आहे; पण आपण त्यांहून अधिक चांगले असतों तर येथे येतों कशाला, याचा कांहीं विचार करा.
 जें जें कांहीं आपणांस प्राप्त होतें, त्याला आपण सर्वथैव पात्रच असतों.. आम्ही चांगले आणि जग वाईट असें जेव्हां आपण म्हणतों, त्यावेळी आपण शुद्ध खोटें बोलत असतो. जगाला उगीच थाप मारण्याचा हा आपला यत्न असतो; पण यामुळे आपण असल्या थापा मारून स्वतःलाच फसवित असतों, हे आपल्या लक्ष्यांत येत नाहीं; इतकेतर आपण शहाणे आहों ! मग जग वेडें की आम्ही वेडे ?
 अत्यंत महत्त्वाचा असा हा पहिला धडा आहे. ज्यावेळी आपणांस दुःखाची प्राप्ति होते, त्यावेळी दुसन्या कोणावर बोटे मोडण्याचें कारण नाहीं. खा शूराला अशी वागणूक सर्वथैव अनुचित आहे. शूर व्हा आणि दुःखाला तोंड द्या. आपल्या स्वतःचा दोष शोधून काढा. खरा मार्ग हाच आहे. आपल्या दुःखाबद्दल इतरांना दोष देण्यापेक्षां तो तुम्ही स्वतःलाच दिला, तर सत्य - मार्गाने गेल्याचें श्रेयतरी तुम्हांला मिळेल. स्वतःवर ताबा चालविण्यास तुम्ही शिकलां, तर त्यांतच तुमचा फायदा आहे.