पान:विवेकानंद.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


 हें अत्यंत दुष्कर कर्म आहे ही गोष्ट खरी; पण सतत अभ्यासाला अशक्य असें कांहींच नाहीं. एक सिद्धांत आपण पक्का लक्ष्यांत बाळगावा, तो हा कीं आपल्या स्वतःच्या तयारीवांचून कोणतेंही दुःख आपणावर हल्ला करूं शक- णार नाहीं. एखादें दुःख यावे अशी तजवीज आपणच आगाऊ करीत असतो. दुःखाला राहण्यासाठी आपणच घर वांधीत असतो. मग तें त्यांत येऊन राहतें हा त्याचा अपराध काय ! मेलेले जनावर जेथें पडलें असेल तेथें गिधाडे आणि डोमकावळे येणारच. आपले शरीर एखाद्या रोगाचें वसतिस्थान होण्यास प्रथम योग्य होते आणि नंतर रोग तेथें येऊन राहतो, हे मी अगोदर सांगितलेंच आहे. रोगबीजें हैं रोगांचें एकटेंच कारण नसतें. शरिराची पूर्व- तयारी असल्याशिवाय रोगबीजें तेथें प्रवेशच करावयाचीं नाहींत आणि यथा- कथंचित् त्यांनी प्रवेश केला तरी ती जगावयाचीं नाहींत. जगांतील प्रत्येक स्थिति आपणांस आपल्या योग्यतेनुरूपच प्राप्त होते. आपला मूर्खपणाचा अभिमान बाजूला ठेवून आधी आपण हैं शिकूं या, कीं जें जें दुःख आपल्या गळीं पडतें, त्याला आपण पात्रच असतों. दुःखानें आपणांस मिठी मारावी अशी पात्रता आपण आपल्या अंगीं आगाऊच आणून ठेवलेली असते. दुःखाचा मार्ग आंखून आणि त्यांतले कांटेकुटे काढून, त्यांतील खांचखळगे आपणच बुजवून ठेवतों, आणि दुःख त्या सरळ रस्त्यानें आपल्याकडे येतें. दुःखाचे मार्गदर्शक दिवटे आपणच, हें अगोदर नीट समजून घ्या. ज्या ज्या वेळी आपणांस धक्के- चपेटे खावे लागले, त्या त्या वेळचा अनुभव नीट ध्यानांत आणा, म्हणजे तुम्हांस असें नि:संशय आढळून येईल की, त्या प्रत्येक वेळी आपण आगाऊ तयारी करून ठेवली होती. अर्धी तयारी आपण करतों आणि बाकीची अर्धी बाह्यजगाकडून होते. अशा रीतीनें पूर्ण तयारी झाल्यानंतर दुःखाचा प्रवेश होतो. याच ठिकाणीं आशेचाही एक तंतु दिसत असतो. 'मला बाह्यजगावर तावा चालवितां येत नाहीं; पण माझ्या अंतर्गत जगावर माझा ताबा चालू शकेल. दुःखाला मार्ग मिळण्यास अंतर्बाह्य अशा दोन्ही गोष्टींची अपेक्षा असते. याकरितां माझ्या बाजूनें तरी मी सुरक्षित राहण्याचा यत्न केला, तर दुःखाचा मार्ग आपोआपच बंद होईल. जर मी माझ्या अंतःसृष्टीवर - माझ्या मनावर ताबा चालवूं शकलों, तर दुःखाचा प्रवेश माझ्या ठिकाणीं कधींही होणार नाहीं.' हाच आपला आशातंतु यालाच अधिक बळकटी आणण्याचा -यत्न आपण करावा.