पान:विवेकानंद.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


अशा वेळीही आपलें ईश्वरत्व विसरले जाणार नाहीं-गाढले जाणार नाहींअशी खबरदारी घ्यावी लागते. आपला सारा दुष्ट स्वभाव यावेळी खवळून उठतो. तो आंतून एकसारखें प्रोत्साहत देत असतो की, “ऊठ, पाहतोस काय, चापटीला चापटी आणि लाठीला लाठी असा वाग; खोट्याला खोटे आणि नायट्याला बिब्बा असा वाग; आतां मागे होशील तर नेभळा ठरशील.' * साध्वी शांति नागविली । मग माया मांगी शृंगारिली । तियेकरवीं विटाळविलीं। साधुबूंदें ॥” अशी ज्यांची करामत ते आपले कामक्रोध संपूर्ण जागे झालेले असतात. अशा वेळी पूर्ण शांति बाळगण्यास, टोल्याला टोला परत न करण्यास आणि अलिप्त राहण्यास, प्रत्यक्ष ईश्वराच्या बळाहूनही अधिक बळ पाहिजे.
 अलिप्त रहावे असा बेत आपण रोज करीत असतो. आपण आपल्या पूर्व आयुष्यक्रमाचे कित्येक वेळां सिंहावलोकन करतो. त्यावेळी ज्यांबद्दल आपणांस आसक्ति वाटत होती असे सर्व विषय आणि मनुष्ये आपल्या मनश्चक्षुपुढे उभी राहतात. त्यांपैकी प्रत्येकाने आपणांस गुलाम करून कसे सोडले होते आणि शेवटी आपणांस दुःख कसे दिलें, याचे आपणांस स्मरण होते. आपण आपलें ईश्वरत्व पार विसरून जाऊन गुलामगिरीच्या जाळ्यांत कसे सांपडलों होतों में आणांस दिसू लागते. 'प्रेम' या भपकेबाज नांवाखाली मोडणा-या गुलामगिरीला आपण त्यावेळी मिठ्या मारीत होतो असे आपणांस समजून येते. दुसरे आपणास त्यावेळी बाहुल्यासारखे नाचवीत होते आणि प्रत्येक दिवशी आपल्या ईश्वरत्वावर एकएक नवें पांघरूण घालीत होते याचे आपणांस स्मरण होते. त्यावेळी आपण पुन्हा एकवार निश्चय करतों की ‘ आतां यापुढे कसल्याच गोष्टीची आसक्ति बाळगावयाची नाहीं. पण उपयोग काय ? " जंव न देखिले पंचानना तंव जंबुक करी गर्जना।” अशी आपली स्थिति होते. पुन्हां मोह आपणांस वश करतो. पुन्हा आपला जीव या जाळ्यांत गुंततो, पक्षी जाळ्यांत सांपडला म्हणजे धडपड आणि फडफड करतो, पण त्या जाळ्यांतून त्याची सुटका होत नाही. हाच आपलाही जीवनक्रम आहे.
 अनासक्तीच्या मार्गात मोठ्या भयंकर अडचणी आहेत ही गोष्ट कबूल केलीच पाहिजे. यांपैकी एखादी अडचणही आपल्या हृदयाचे पाणी करून