पान:विवेकानंद.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
कर्मरहस्य.

२१७


घेण्याकरितां तयार असतात; देण्याचे धैर्यच आपणांस नसते. प्रकृतीच्या या मागणीला पुरे पडण्याची आपली तयारी नसते, ह्मणून आपणांस अनेक प्रकारची दुःखें भोगावी लागतात. सूर्य सदोदित समुद्राचे पाणी शोषीत असतो, तें पावसाच्या रूपाने परत देण्याकरितांच शोषीत असतो. सर्व जगभर हाच व्यवहार चालू आहे. आपण मनुष्ये ह्मणजे प्रकृतीची दे, घे, करण्याची यंत्रे आहों. एकाकडून घ्यावयाचे आणि दुसन्यास द्यावयाचे हा प्रकृतीचा व्यवहार आपल्यामुळे चालतो. याकरितां आपणापाशीं जें कांहीं येते ते देण्याकरितां येते असे समजावे. याकरितां दानाबद्दल उलट अपेक्षा करणे हे प्रकृतीच्या कायद्याविरुद्ध आहे. अधिक अधिक देत गेलो, तर अधिकाधिकाची प्राप्ति तुह्मांस आपोआपच होईल.
 या खोलीतली हवा तुम्हीं जितक्या जलदीने बाहेर काढून टाकाल, तितक्याच लवकर बाहेरची हवा आंत भरेल; पण ही सर्व दारे आणि खिडक्या तुम्हीं बंद केल्या, तर आंतली हवा आंतच राहील; पण बाहेरची हया मात्र आंत येणार नाही. असे झाले ह्मणजे आंतील हवा कोंडून राहील आणि खराब होऊन शेवटी पूर्ण विषारी बनेल. नद्या एका बाजूने आपले सर्व पाणी समुद्राला अर्पण करीत असतात; आणि दुस-या बाजूने एकसारख्या भरत असतात. या विश्वव्यापी समुद्रात प्रवेश करण्याची आपली द्वारें बंद करू नका. ही द्वारें बंद करून वसलां, की मृत्यूने तुम्हांस घरलेंच.
 याकरितां भिक्षावृत्तीचा अवलंब करू नका; आणि सदोदित अनासक्त रहा. अशा रीतीने राहणे अत्यंत कठीण आहे. या मार्गातील भयंकर अडचणींची आणि दुष्ट श्वापदादिकांची नुसती कल्पनाही आपणांस करवत नाहीं. या मार्गातल्या अडचणी यथाकथंचित् अत्यंत तीव्रबुद्धीमुळे जाणतां आल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष गराडा पडेपर्यंत त्यांच्या भयंकरपणाची खरी कल्पना आपणांस झालेली नसते. एखाद्या रमणीय उद्यानाचा देखावा लांबून पाहून त्याची कल्पना अंशतः मात्र आपणांस होते; तथापि आपली नजर रूपरेषेच्या आंत मात्र गेलेली नसते. त्याची यथार्थकल्पना होण्याला त्या उद्यानांतच प्रवेश केला पाहिजे. एखाद्या कार्यात आपणांस भयंकर अपयश आलेले असते. आपल्या अंगांतील सर्व जीवन सुकून गेलेले असते आणि शत्रूनी आपली लांडगेतोड चालविलेली असते. अशाही वेळी हृदयास बांध घालावा लागतो.