पान:विवेकानंद.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
कर्मरहस्य.

२११


सततं कार्य कर्म समाचर । असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥
( गीता ३. १९. )
 आपण आपल्या आयुष्यांतील अनुभव तपासून पाहिले तर आपल्या दु:- खाचें एक मोठे कारण विशेषेकरून आढळून येतें, तें हें कीं, आपण एखादें कार्य हाती घेतों त्यावेळी मोठ्या उत्साहाने आपली सर्व कर्तबगारी त्या ठिकाणीं खर्ची घालतों, आणि इतके करूनही कित्येक वेळां आपला डाव फसतो. पण. आपली आसक्ति त्या कर्माच्या ठिकाणी इतकी पक्की जडलेली असते, कीं तें कार्य सोडून देणें आपल्या जिवावर येतें. 'धरलें तर डसतें आणि सोडलें तर पळतें,' अशी आपली स्थिति झालेली असते. त्या कार्याला चिकटून राह ण्यांत आपण आपल्या पायांवर धोंडा पाडून घेत आहोत हे आपणांस कळते; त्या कार्याच्या मागे लागण्यांत आपणांस दुःखावांचून दुसरें कांहीं पदरीं पडा- वयाचें नाहीं अशी आपली खात्री असते; तथापि त्याचा मोह इतका अनिवार असतो, की ते आपल्या हातून सोडवत नाहीं. मधमाशी मध खाण्याकरितां एका मधाच्या भांड्यावर येऊन बसली; पण तिचे पाय भांड्याला चिकटून बसले आणि तिला पुढेही जातां येईना अथवा मागेंही येतां येईना; तशीच आपली गत होते. हा अनुभव वारंवार आपल्या आयुष्यांत आपणांस येतो. आपल्या साऱ्या जीवनक्रमाचा आढावा काढला, तर तो बहुधा असल्या प्रसंगांनी भरला असल्याचे आढळून येईल. आपण या जगांत जन्म कां घेतला ? येथें येण्यांत आपला उद्देश मध खाण्याचा होता; पण आमचे हात- पाय भांड्याला चिकटून मात्र बसले. आपण येथें चैन करण्याकरितां आलों; पण आपल्या जीवावर दुसरेच चैन करूं लागले. राज्यासनावर बसून प्रभुत्व गाजवावें या उद्देशाने आपण येथें आलों; आणि पहावें तों सृष्टीचे बंदे गुलाम होऊन बसलों. कांहीं स्वतंत्र कर्तबगारी करावी हा आपला उद्देश; पण आतां सृष्टीच्या हाताखाली पाट्या उचलण्यापलीकडे आपण कांहींच करीत नाहीं. सतत हें असेंच चालू आहे. आपल्या आयुष्यक्रमांतील बारीकसारीक गोष्टींतसुद्धां हीच तन्हा. आमच्यावर हजारों मनांचा ताबा; आणि आपण हजारों मनांवर ताबा मिळविण्याकरितां धडपडत असतों ! या सुखकर वस्तूंचा आस्वाद घेण्याची आपली इच्छा आहे; पण पहावें तों हीं सुखें आमचीं जिव्हारें खात आहेत. या सृष्टीपासून सर्व कांहीं वैभव बुचाडून घेण्याची खटपट आह्मी