पान:विवेकानंद.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


करतों; पण शेवटीं पहावें तों सृष्टीनेंच आमचें सर्वस्व घेऊन आह्मांस नागवें उघडें करून कोठें तरी ढकलून दिलेले असतें !
 अशा गोष्टी घडत नसत्या तर केवढी मौज झाली असती ! सारा जन्म आह्मी दिवाळी केली असती ! पण — असो. धीर सोडून फायदा नाही. आपल्या आयुष्यांत आपणांस कितीही ठोकरा लागल्या असल्या अथवा लहानसहान जय मिळाले असले, त्यांत कितीही सुखदुःखाचे प्रसंग आले असले, तरी अजूनही आपल्यास एकसारखी दिवाळी करता येईल. पण हे होण्याला सृष्टी- च्या जाळ्यांत न सांपडण्याची खबरदारी मात्र घेतली पाहिजे.
 आपल्या दुःखाचें पहिले मोठे कारण आसक्ति हेंच आहे. आसक्ति उद्भ- वली, कीं सृष्टीच्या जाळ्यांत पाय गुंतलेच. याकरितां गीतेची अनुज्ञा अशी. आहे, की सदोदित काम करा; पण तें अनासक्त चित्तानें करा. त्या कामांत गुंतून पडूं नका. आपणांस वाटेल तेव्हां आपलें अंग त्यांतून काढून घेतां येईल इतकी चित्ताची तयारी असूंद्या. एखाद्या वस्तूकडे तुमचा जीव कितीही ओढ घेत असला, अथवा एखादी वस्तु तुम्हांला अत्यंत आवडती असली, अथवा एखाद्या वस्तूचा त्याग तुमच्या केवढ्याही मोठ्या दुःखास कारण होणार असला, तरी अशा स्थितीतही वाटेल त्यावेळी त्या वस्तूचा त्याग कर ण्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. दुर्बळ मनुष्याला कोणत्याही कार्यात यश येणे शक्य नाहीं. या लोकांत काय अथवा दुसऱ्या एखाद्या लोकांत काय, दुबळ्याला कवडीचीही खरी किंमत नाहीं. मनाचा दुबळेपणा हा साऱ्या गुला- मगिरीचा मूळ पाया आहे. शारीरिक आणि मानसिक दुःखें उत्पन्न होण्याचें कारणही हा दुबळेपणाच. दुवळेपणा ह्मणजे खरोखर साक्षात् मृत्यूच. आपल्या भोंवतालच्या वातावरणांत लक्षावधि रोगजंतू असतात; पण आपण दुर्बळ झाल्याशिवाय ते आपणावर हल्ला करूं शकत नाहीत. आपल्या दुर्बळपणामुळे आपले शरीर या जंतूंना राहावयास योग्य होतें; आणि मग तें स्वतःचें घर आहे असे समजून रोगबीजें तेथें प्रवेश करतात. आपल्या भोवती दुःखकारक अशा लक्षावधि गोष्टींचा आणि लक्षावधि रोगबीजांचा गराडा पडला असला तरी काय होणार ? आपल्याजवळ येण्याची त्यांची छाती नाहीं, आपल्यावर ताबा चालविण्याचें सामर्थ्य त्यांना नाहीं. मन जर अशक्त झालें तर मात्र गोष्ट निराळी. आपला एकंदर आयुष्यक्रम मुख्यतः ज्यावर अवलंबून आहे, असा हा