पान:विवेकानंद.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


एकसारखेच आहेत. धर्मगिरीच्या अत्युच्च शिखरावर आरोहण करण्यास मानवकुलाला जितका मार्ग आक्रमण करावा लागला, , तितकाच मार्ग आक्रमण करणें प्रत्येक व्यक्तीलाही अवश्य आहे. आतां यांत सवड एवढीच आहे कीं, मानवकुलाला एका पायरीवरून दुसरीवर आणि दुसरीवरून तिसरीवर जाण्यास लक्षावधि वर्षांचा काळ लागला; पण एका व्यक्तीला तोच मार्ग थोड्याशा वर्षात आक्रमण करतां येईल. फार काय सांगावें, पण वेगवान् मनुष्य हा लक्षावधि वर्षांचा मार्ग सहा महिन्यांत चालून जाईल. सर्व रस्ता संपविल्यावांचून मात्र सुटका नाहीं. आज एखादा पूर्ण अद्वैती बनला असेल; पण त्याने आपल्या आयुष्यांतील पूर्वक्रमाची झडती घेतली तर आपण पक्के द्वैती होतों असे त्यास आढळून येईल. जोपर्यंत देहभाव गेला नाहीं, आणि आत्मभाव आला नाही, तोपर्यंत तें द्वैतच. जोपर्यंत 'देह मी, ' ' मन मी' असें वाटत आहे तोपर्यंत या साऱ्या विश्वाचें अस्तित्व कवूल करणें आपणांस भागच आहे. एखादा भाग आहे असे म्हटले म्हणजे सर्व वस्तु आहे असे म्हणण्यास नड कशाची ? कित्येक लोक असे असतात की त्यांना जगाचें अस्तित्व मान्य असतें, कारण ते प्रत्यक्ष दिसतें; पण त्यांना ईश्वराचें अस्तित्व मात्र मान्य नसतें; पण या मूर्खशिरोमणींना असे कळत नाहीं कीं जग हें कार्य जर 'आहे' म्हणतां तर त्याचें कारण नको काय? या कारणरूपालाच परमेश्वर असें नांव आहे. कारणावांचून कार्य घडूं शकतच नाहीं. कार्य आहे असें कबूल केले की कारण कबूल केलेच पाहिजे; अथवा दोहोंचाही त्याग करण्यास तुम्हांला पूर्ण मोकळीक आहे. विश्व नष्ट होईल तेव्हांच परमेश्वर नष्ट होईल. तुम्ही स्वतःच परमात्मरूप होऊन बसलां, तरच जगाचें अस्तित्व तुमच्या दृष्टीनें नाहींसें होईल; पण जोपर्यंत स्वप्नांश शिल्लक आहे, तोपर्यंत आम्हांस जन्म आहे, मरण आहे, आणि ईश्वराचें अस्तित्वही आहेच आहे; पण 'मी' म्हणजे देह, हा भ्रम नाहींसा झाला या स्वप्नाचा अंत झाला कीं जन्म नाहीं, मृत्यु नाहीं आणि स्वप्नांतील इतर विश्वादि वस्तू याही नाहींत. जें आज आपणांस विश्व या रूपानें दिसत आहे, तेंच अशा स्थितींत परमात्मरूपानें दिसूं लागेल. जो ईश्वर आजपर्यंत विश्वाच्या बाहेर कोठें तरी असल्यासारखा वाटत होता, तो आपल्या हृदयांतच आहे किंबहुना तोच आपण आहों असा अनुभव येईल, हेच अद्वैतमताचें अंतिम साध्य. 'तत्त्वमसि । '

ॐ शांतिः शांतिः शांतिः ।