पान:विवेकानंद.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


तर असतें. परमात्मा हैं उपादानकारण आहे असे म्हटले तर विश्व हैं त्याचेंच रूप आहे असें ह्मटले पाहिजे. यावर एक प्रश्न असा उद्भवतो की जर परमे श्वर विश्वरूप झाला असेल, तर यांतील प्रत्येक वस्तु परमेश्वरच म्हटली पाहिजे. होय, प्रत्येक वस्तु परमेश्वरच आहे. माझें शरीर परमेश्वर, मन परमेश्वर आणि माझा आत्माही परमेश्वरच आहे. मग इतके जीव कोठून उत्पन्न झाले ? पर- मेश्वराचे लक्षावधि भाग झाले काय ? अनंताचे भाग पाडणें शक्य नाहीं. पर मात्मा विश्वरूप आहे असे म्हटले तर तो रूपांतरक्षम आहे हेंही कबूल करावें लागेल. जें कांहीं रूपांतरक्षम आहे तें प्रकृतीच्या आधीन असावयाचेंच असा सिद्धांत आहे. आणि जें कांहीं प्रकृतीच्या आधीन असेल त्याला जन्ममृत्यु असावयाचे. परमात्मा रूपांतरक्षम असेल, तर त्यालाही एखादे दिवशीं मरण येणारच. दुसरें असें कों, परमात्म्याचा किती भाग विश्वरूप झाला आहे असे ह्मणावें ? बीजगणिताच्या पद्धतीनें 'क्ष' हा भाग विश्वरूप झाला आहे असें मानिलें तर विश्व निर्माण झाल्यानंतर परमेश्वराचें रूप ह्मणजे परमात्मरूप -क्ष - " असें झालें. यामुळे विश्व निर्माण होण्याच्या अगोदर जें कांहीं परमा- त्म्याचें रूप होतें तें हैं नव्हे असें आपोआपच सिद्ध झाले. या सर्व शंकांवर अद्वैती असे उत्तर देतो कीं, विश्वाला वास्तविक अस्तित्व नाहीं. त्याचें अस्तित्व हा एक देखावा आहे स्वप्न आहे. देव, दानव आणि मनुष्ये व इतर पदा येतात आणि जातात व जन्म घेतात आणि मृत्यु पावतात, हें सारें स्वप्न आहे; जें कांहीं आहे तें एकरूपच आहे. पाण्याच्या हजारों बिंदूंवर एकच सूर्य प्रकाशला, ह्मणजे त्या बिंदूंत प्रत्येकी एक निराळा सूर्य दिसूं लागतो; तथापि सूर्य एकच असतो. त्याचप्रमाणे अनंत जीव हीं एकाच अनंताचीं अनंत प्रति- बिंबे आहेत. स्वप्न हे सुद्धां सत्य वस्तूंचेंच असतें. त्याचप्रमाणें परमात्मा ही एक सत्यवस्तु असून त्याचींच हजारों प्रतिबिंबें आपण स्वप्नांत पाहत आहों. आपणाला शरीर आहे, मन आहे आणि आत्मा आहे, असें वाटणें हें स्वप्न आहे. वस्तुतः तुम्ही सच्चिदानंद रूप आहां. हे जन्म आणि पुनर्जन्म, हें जाणें आणि येणें, हीं सारीं मायिक-काल्पनिक आहेत. तुम्ही स्वतः अनंत आहां. मग तुम्ही येणार कोठून आणि जाणार कोठें? हे चंद्रसूर्यादि गोल तुमच्या अनंत रूपांतून उडालेले तुषार आहेत. आत्म्याला जन्म नाहीं आणि मृत्युही नाहीं. त्याला कोणी आई नाहीं, कोणी बाप नाहीं, कोणी मित्र नाहीं आणि कोणी शत्रुही नाहीं. तो केवळ सच्चिदानंदरूप आहे.