पान:विवेकानंद.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन - प्रकरण ७ वें.

२०५


या विश्वाचें उपादानकारण आहे आणि निमित्तकारणही तोच आहे, असे ह्मटलें तर येथें दुसरीच एक शंका उद्भवते. या सर्व विश्वांतील वस्तू परमेश्वर असें ह्मटलें तर यांतील दुष्ट वस्तूही परमेश्वरच काय ? हे जड पदार्थ अथवा पशुपक्ष्यादि प्राणी अथवा एखादा आसुरी वृत्तीचा मनुष्य हीं सुद्धा त्याचींच रूपें काय ? परमेश्वर पवित्र आहे तो ह्रीं रूपें कशीं घेईल? यावर उत्तर असें कीं, परमेश्वराचीं ह्रीं रूपांतरें नसून ती प्रकृतीचीं रूपांतरें आहेत. एका व्यक्तीत आत्मा आणि देह ह्रीं आहेत. देह व्यक्तीपासून निराळा आहे असे नाहीं, तथापि देह ह्मणजे मात्र खरी व्यक्ति नव्हे. एकाच देहाला कौमार, यौवन आणि जरा इतकीं रूपें प्राप्त होतात. तथापि त्यांमुळे आत्म्यांत कांहीं बदल होत नाहीं. आत्मा सर्व काल एकरूपच असतो. त्याचप्रमाणे सर्व विश्व ह्मणजे प्रकृति हें परमात्मशरीर आहे. त्यांतील रोमरोमांत परमेश्वर भरून राहिला आहे. प्रकृतींत वारंवार बदल होतो; पण परमेश्वराचें मात्र रूपांतर होत नाहीं. प्रकृतींत बदल होतो त्याबरोबर जीवात्म्यांतही बदल होतो. प्रकृतींत बदल होतो ह्मणजे तिच्या आकारांत मात्र बदल होतो. जीवात्म्यांत बदल होतो, तो लहान मोठेपणाच्या स्वरूपाचा असतो. ज्ञानाने जीवात्मा विस्तृत होतो अगर अज्ञानानें संकुचित होतो. ज्यामुळें जीवात्मा संकुचित आणि मलिन होतो, त्या कृत्यांस वाईट असें ह्मणतां येतें; आणि ज्या कृत्यांमुळे त्यांचें तेज फांकू शकतें तीं कृत्यें शुभ कृत्यें होत. जीवात्मा आरंभी शुद्धच असतो पण स्वतःच्या कर्मानीं तो अशुद्ध होतो. तथापि शुभकृत्यांनी आणि परमेश्वराच्या कृपेनें तो पुन्हा विस्तार पावून शुद्ध होऊं शकतो. वेदान्तांतील ही दुसरी पायरी आहे. या मताप्रमाणें जीवात्मे आणि इतर प्रकृति मिळून परमात्म्याचें- ईश्वराचें- शरीर बनतें. या मताला विशिष्टाद्वैत असें नांव आहे.
 यानंतर अद्वैतमत; हे सर्वात अत्युच्च मत आहे. परमेश्वर हा या विश्वाचें उपादान आणि निमित्तकारण आहे, हे प्रतिपादन अद्वैतमतास मान्य आहे. हें सर्व विश्व परमात्मरूपच आहे. परमेश्वर हा आत्मा आणि विश्व हें शरीर असून शरिरांत बदल होतो हें विशिष्टाद्वैतमताचें प्रतिपादन अद्वैतमताला मान्य नाहीं. हें मान्य केलें तर परमेश्वर विश्वाचें उपादानकारण आहे असें ह्मणण्यांत काय अर्थ आहे ? उपादानकारण आणि कार्य हीं सदैव एकरूप असतात. कार्य ह्मणजे कारणाचेंच निराळें रूप. कार्य हें कारणाचेंच स्थूल रूपां-