पान:विवेकानंद.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन-प्रकरण ७ वें.

२०३


यातना भोगितों त्या कां? यावर ते असे उत्तर देतात कीं, हा परमेश्वराचा दोष नव्हे. आपल्याच अपराधाचा हा दंड आहे. आपल्याच अपराधामुळे हे दुःख आपल्या वांट्याला येतें. जसें पेरावें तसे उगवतें यांत नवल काय? आपणांस शिक्षा व्हावी अशी परमेश्वराची इच्छाही नाहीं. एखादा मनुष्य जन्मतःच दरिद्री, अंध, अथवा लंगडा असला तर तें त्याच्या पूर्वजन्मींच्या कर्माचें फळ आहे. जीव नव्हता असा कोणताच काळ नाहीं. तो सर्व काळीं होताच. त्याला कोणींच नवीनच जन्मास घातलें असें नाहीं. तो अनंत काल अनंत प्रकारच्या क्रिया करीत आहे. तो ज्याप्रमाणें क्रिया करतो त्याप्रमाणें त्यांची सुखदुःखादि फळें भोगतो. चांगली क्रिया केली तर सुख प्राप्त होते आणि वाईट कर्माचें फळ कडू आणि दुःखदायक असतें. जीव हा स्वभावतः शुद्ध आहे - पवित्र आहे. पण अज्ञानाचें पांघरूण त्यावर पडतें आणि त्यामुळे तो भलत्या प्रकारें वागतो असे द्वैतवादी सांगतात. अज्ञान जसे वाईट कृत्यांमुळे उद्भवले आहे, त्याचप्रमाणे शुभकृत्यांनीं तें निघून जाईल आणि जीवाला स्वतःचें पूर्वीचें शुद्ध रूप प्राप्त होईल. तो स्वभावतः अनंत आणि शुद्ध आहे. शुभकर्मानी त्याची पापें नाश पावलीं ह्मणजे तो पुन्हां शुद्ध हातो. मृत्यू पावल्यानंतर तो देवयानानें स्वर्गलोकीं जातो. स्वर्गलोकीं सर्व देवांची वस्ती आहे. जर तो केवळ सामान्यतः चांगला माणूस असेल तर त्याला पितृलोकाची प्राप्ति होते. पितृलोकांत सर्व पितरांची वस्ती असते.
 जडशरिराचा पात झाला ह्मणजे वाचा मनांत प्रवेश करते. शब्दाच्या साहाय्यावांचून विचार करणें आपणांस शक्य नाहीं, हा आपला अनुभव लक्ष्यांत आणा. ज्या ठिकाणीं शब्द त्याच ठिकाणी विचारांची उत्पत्ति होते. मन प्राणांत प्रवेश करतें, आणि प्राण जीवांत प्रवेश करतो. इतकी तयारी झाली ह्मणजे जीव देह सोडतो आणि आपल्या कर्माची बरी अथवा वाईट फळें भोगण्याकरितां योग्य ठिकाणीं जातो. देवलोक ही देव राहण्याची जागा आहे. देव ह्मणजे तेजस्वी प्राणी. ख्रिस्ती आणि महंमदी धर्मग्रंथांत ज्यांना देवदूत झटलें आहे तशाच प्रकारची आमची देवांबद्दलची कल्पना आहे. डान्टे यानें- ही अनेक प्रकारचें लोक वर्णिले आहेत; त्याच लोककल्पना आमच्या द्वैत- मतांतही आहेत. एकाचें नांव पितृलोक, दुसऱ्याचें देवलोक, तिसऱ्याचे ब्रह्मलोक इत्यादि. खालच्या दर्जाच्या लोकास गेलेला जीव पुन्हा मृत्युलोकांत