पान:विवेकानंद.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ]

वेदांतमताचें सामान्य निरीक्षण,

११

स्वरूप काय आहे याचा प्रत्यय त्यास त्याच वेळी येईल. अशा रीतीने स्वतःच्या विश्वव्यापकतेचा प्रत्यय त्याला आला तरी त्यामुळे त्याचा चालू देह नष्ट होईल असे मात्र नाही. चालू देह हा प्रारब्धकर्माचा असल्यामुळे त्या कर्माचा क्षय होईपर्यंत चालू देहही राहीलच. आत्मानुभवानंतर केवळ कर्मक्षयाकरितां ज्याचा देहबंध राहिला आहे अशा मनुष्याला जीवन्मुक्त ह्मणतात. अनुभवानंतर देह शिल्लक राहिला तरी त्यामुळे तो पुन्हां मायाजालांत सांपडत नाही, आणि क्षुद्र अहंकारही त्याच्या ठिकाणी पुन्हां उद्भवत नाहीं. मृगजलाच्या आभासाने फसलेल्या मनुष्यास पुन्हां मृगजलाचे दर्शन झाले असतां जसा तो पुन्हां फसत नाहीं त्याचप्रमाणे विश्वव्यापी झालेला प्राणी मायाजालाच्या देखाव्याने फसत नाही. जोपर्यंत देह अवशिष्ट असेल तोपर्यंत आपणा सामान्य मनुष्यांप्रमाणेच त्यास हे जग दिसत राहील; पण त्याच्या दर्शनानें तो मोह मात्र पावणार नाहीं. ब्राह्मी स्थितीत प्राप्त झालेल्या जागृतीला मोहनिद्रा पुन्हा वश करू शकत नाही. अशा रीतीने ब्रह्मस्वरूपास प्राप्त झालेल्या ज्ञान्याच्या दृष्टीने जगाचे अस्तित्वच नष्ट होते. देहावसानापर्यंत जीवन्मुक्ताला जगाचा अनुभव होत राहिला तरी जग ह्मणजे दुःखाचे माहेरघर हा जो आपणा सामान्य मनुष्यांचा अनुभव तो मात्र त्याच्या ठिकाणीं संभवणार नाहीं. जग ह्मणजे सच्चिदानंदरूप असेंच तो ह्मणेल. स्वतः सच्चिदानंदरूप होणे हेच अद्वैत तत्त्वज्ञानाचे साध्य आहे.

=