पान:विवेकानंद.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ

.

[तृतीय

मान् मानवी प्राण्यापर्यंत सर्वांच्या अंतर्यामी त्या एकाच परमात्मरूपाचा वास आहे. मायेचे आवरण अधिक दाट असल्यामुळे क्षुद्रप्राण्यांतील ईश्वरत्व अधिक अंधुक दिसत असून अत्यंत बुद्धिमान् प्राण्यांत हा पडदा कमी दाट असतो, इतकाच त्या दोघांमध्ये वास्तविक फरक आहे. प्रत्येक वस्तुमात्रांत ईश्वरत्व वास करीत आहे या मूलभूत पायावरच जगांतील एकंदर नीतिसिद्धांतांची उभारणी झाली आहे. परक्यास कधींहि दुःख देऊ नका. तुमचे स्वतःबद्दल जितकें प्रेम आहे तितकेंच ते परक्यांवरहि असू द्या; कारण त्यांच्या आणि तुमच्या अंतर्यामी एकाच परमात्मरूपाचा वास आहे. सर्व विश्व वस्तुतः एकरूपच असतां त्या ठिकाणी द्वैताची खोटी भावना उत्पन्न करून परक्यास दुःख. देणे ही कुबुद्धि आहे. परक्यास दुःख देणे ह्मणजे स्वतःस दुखविण्यासारखेच आहे, आणि परक्यावर प्रेम करणे ह्मणजे स्वतःस सुखी करणेच होय.
 एकंदर अद्वैत सिद्धांतांतील नीतितत्त्वांचे सार एकाच शब्दांत सांगावयाचे ह्मटले तर ते अहंकारविस्मृति या शब्दाने सांगतां येईल. एकाच देहांत सर्वस्व सांठविलें आहे असे मानणारा क्षुद्र अहंकार हाच एकंदर दुःखाचें मूलकारण आहे असे अद्वैताचे सांगणे आहे. अहंकारामुळेच माझ्या विश्वरूपाचा विसर मला पंडतो आणि या विश्वापासून मी एक वेगळा प्राणी आहें असा भ्रम माझ्या ठिकाणी उत्पन्न होतो. असा भ्रम उद्भवला ह्मणजे असूया, क्रोध इत्यादि भावना माझ्या अंतःकरणांत घर करू लागतात. या भावना बळावल्या ह्मणजे स्वतःच्या सुखासाठी परक्यांबरोबर युद्धे सुरू होतात आणि त्यांमुळे दुःखाची प्राप्ति मात्र मला हटकून होते. ही अहंकारकल्पना नष्ट झाली ह्मणजे ही युद्धे बंद होऊन त्यांबरोबर दुःखांचीही समाप्ति होईल. यासाठी अहंकाराचा त्याग अवश्य आहे. अत्यंत क्षुद्र अशा प्राण्यासाठी सुद्धा या आपल्या देहावर पाणी सोडण्याची आपली तयारी असली पाहिजे. इतकी ज्याची तयारी झाली असेल तो मनुष्य विश्वव्यापी होण्याच्या पंथास लागला असे अद्वैत सिद्धांतांचे सांगणे आहे. विश्वव्यापी होणे हेच अद्वैतमताचे साध्य आहे. क्षुद्र प्राण्यासाठीही देहत्याग करण्याइतकी ज्याची तयारी झाली असेल त्या मनुष्यावरील मायेचा-अज्ञानाचा-पडदा दूर होऊन त्यास स्वतःच्या परमात्मरूपाचा अनुभव होईल. या चालू देहांत असतांच स्वतःच्या विश्वव्यापकपणाचा प्रत्यय त्याला येईल. या सर्व विश्वाचे अधिष्ठान आणि स्वतःचे खरें