पान:विवेकानंद.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन - प्रकरण ७ वें.

१९७

प्रकरण ७ वें.


ज्ञानयोगाचा अत्युच्च आदर्श.


 चालू व्याख्यानमालेतील हें शेवटचें व्याख्यान असल्यामुळे, मी आजपर्यंत आपणांस जें कांहीं सांगितले, त्याचें आज सिंहावलोकन करावें असा माझा विचार आहे. वेद आणि उपनिषदें यांत हिंदूंच्या धर्मसंबंधी अत्यंत प्राचीन कल्पना आढळून येतात. श्रीकपिल महामुनि हे प्राचीन खरे, पण वेद त्यांहूनही फार प्राचीन आहेत. सांख्यशास्त्र हे त्यांनीं अगदींच नवें शास्त्र प्रकाशांत आणलें असें नाहीं. त्यावेळी ज्या हजारों धर्मकल्पना इतस्ततः बावरत होत्या त्या सर्वांना एका सूत्रांत ओवून त्यांचा एक सर वनविण्याचे कार्य मात्र त्यांनी केले. सर्व धर्मकल्पना मुळांत होत्याच; पण त्या विस्कलित होत्या. त्यांना एकतानता आणि विशेष प्रकारचें शास्त्रीयरूप हीं नव्हतीं. श्रीकपिलांनीं आपल्या विशाल बुद्धीच्या प्रभावानें या विस्कलित कल्पनांतून शास्त्र निर्माण केले. बाह्यतः एकमेकांशी विरोधी दिसणारी अशी अनेक मतें हिंदुस्थानांत आज प्रचलित आहेत. या सर्व मतांनीं श्रीकपिलांच्या सूक्ष्मेंद्रियशास्त्राचा आधार घेतला आहे. श्रीकपिलांनीं जें शास्त्र निर्माण केलें, तें आजतागाईत सर्व प्रकारच्या पंडितांस मान्य झाले आहे. श्रीकपिलांनंतरही अनेक दर्शन- कार होऊन गेले; तथापि मानवी मनाचें त्यांनी केलेले पृथक्करण आणि त्यांचें सर्वव्यापी दर्शन यांजवर कडी करणारा तत्त्वदर्शी आजतागाईत कोणीही झाला नाहीं. त्यांच्या सांख्यदर्शनानंतर अद्वैतमताचा उद्भव झाला हे खरें; तथापि त्या मताचा पाया श्रीकपिलांनींच घातला असे म्हणण्यास यत्किंचितही प्रत्य- वाय नाहीं. श्रीकपिलांनीं इमारतीचा जेवढा भाग रचिला होता तोच हातीं घेऊन इमारत पुरी करण्याचे काम मात्र अद्वैतमतानें केलें. सांख्यमताचें पर्यवसान द्वैतमतांत होतें, त्याचीच सर्व पूर्वपीठिका अद्वैतमतानें घेतली आणि त्याच विचारसरणीनें आणखी एक पाऊल पुढे टाकून अद्वैतमतानें शेवटीं सर्व 'एकच' आहे असे स्थापित केलें.
 श्रीकपिलांच्या काळापूर्वी जितक्या कांहीं धर्मकल्पना अस्तित्वांत होत्या, त्यांपैकी अत्यंत प्राचीन कल्पनासमूहांतही अंतर्ज्ञानकल्पनेचा समावेश झाला असल्याचे आढळून येतें. अमुक पुस्तक अथवा तत्त्वज्ञान है परमेश्वराकडून