पान:विवेकानंद.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ६ वें.

१९५


'एकच आनंद पाहण्याजोगी स्थिति तुम्हांस प्राप्त होईल, ज्यावेळी दारूबाजाच्या आनंदांत आणि शुद्ध सात्विक साधूच्या समाधिसुखांत एकाच आनंदाची व्याप्ति तुम्हांस दिसूं लागेल, त्याचवेळी सत्याशी तुमची प्रत्यक्ष भेट होईल; आणि त्याचवेळीं सुख म्हणजे काय हें तुम्हास बरोबर कळूं लागेल; त्याचवेळीं शांति म्हणजे काय व प्रेम ह्मणजे काय हेंही तुम्हास कळेल. जोपर्यंत तुमच्या हृदयांत हे खोटे भेद जिवंत आहेत, या पोरकट आणि खुळसट कल्पना वास्तव्य करून आहेत, तोपर्यंत सर्व प्रकारचीं दुःखें आणि आपत्ती बोलावण्यावांचून येतील. तोच अनंतप्रकाश सर्व विश्वाचे अधिष्ठान आहे. हा सर्व आनंद त्याचाच आहे. ही देहरचना म्हणजे विश्वरचनेचा एक लहानसा नमु. नाच आहे. या देहांत प्रत्ययास येणाऱ्या सर्व प्रकारच्या शक्तींतून आणि मनाला प्राप्त होणाऱ्या आनंदांतून तोच प्रकाश प्रकाशत आहे. देहांत प्रकाशणारा तो प्रकाश म्हणजे आत्मा. 'हे जग सर्वांना प्रिय आहे आणि जगाला सर्व प्रिय आहेत-'; कारण, तोच अनंत या विश्वांतील आनंद आहे. तोच ब्रह्म 'हैं वातावरण सर्व प्राण्यांना प्रिय आणि वातावरणाला सर्व प्राणी प्रिय -'; कारण, तोच स्वयंप्रकाश अनंत वातावरण आहे. तोच या देहांतही आहे. सर्व प्राण्यांत तोच चैतन्यरूपानें व्यक्त होतो. 'सूर्य सर्व प्राण्यांना प्रिय आहे आणि सूर्याला सर्व प्रिय आहेत -'; कारण, तोच स्वयंप्रकाश सूर्य आहे आणि आपण सर्व त्याच्याच लहान लहान ज्योती आहोंत. 'हा चंद्र सर्वांना प्रिय आहे आणि चंद्राला सर्व प्रिय आहेत; ' कारण, तोच स्वयंप्रकाश अनंत चंद्राचा आत्मा आहे. तोच मनोरूपानें आमच्यांत प्रकाशत आहे. 'ही विद्युत् सर्वांना प्रिय आहे आणि विद्युत्ला सर्व प्रिय आहेत; कारण, तोच स्वयंप्रकाश अनंत, या विजेचा आत्मा आहे; आणि तोच आपणांतही आहे. कारण, "सर्वं खल्विदं ब्रह्म. ” हें ब्रह्म-आत्मा - हाच सर्वांचा अधिपति आहे. या सर्व कल्पना आपल्या मानवजातीला अत्यंत हितकर आहेत. या सर्व कल्पना ध्यानार्ह आहेत. पृथ्वीचें ध्यान करावें, आणि त्याचवेळीं अशीही विचारजागृति ठेवावी कीं या पृथ्वीत जें कांहीं आहे ते माझ्यांतही आहे आणि पृथ्वी व मी एकरूपच आहों. हा देह म्हणजेच पृथ्वी. अशा एकरूपानें या कल्पनेचा विचार करावा, आणि या पृथ्वीचा व आपला प्रकाशक एकच आहे, अशी पंकी भावना करावी. या हवेचा चालक आणि आपला चालक एकच आहे अशी भावना करावी. "