पान:विवेकानंद.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन-प्रकरण ६ वें.

१९३


'वाईट' असें नांव देतों. जेव्हां आत्मरूपावरील आवरण अधिक दाट असतें, तेव्हां आपण त्याला अंधार-वाईट असे म्हणतों आणि ज्यावेळी हें आवरण विरल असतें, तेव्हां त्याला आपण प्रकाश - चांगले असें म्हणतों. चांगलें आणि वाईट ह्रीं वस्तुतः भिन्न रूपें नाहींत. त्यांत फरक आहे तो फक्त परि- माणाचा आहे. एकांत आत्मरूप अधिक व्यक्त झाले असून दुसऱ्यांत तें कमी व्यक्त झाले आहे. आपण आपलाच अनुभव चाळून पाहिला तरी हेंच आढ- ळून येतें. आपल्या लहानपणीं कित्येक गोष्टी आपणांस चांगल्या वाटत अस- तात; पण त्याच वाईट असतात असा अनुभव नंतर आलेला असतो. त्याच- प्रमाणें आरंभी वाईट म्हणून वाटत असलेल्या गोष्टी, नंतर चांगल्या वाटू लागतात. आपल्या आयुष्यांतील बऱ्यावाईट कल्पनांत बदल किती वेळां होत असतो याचा विचार करा. आपल्या कल्पनांची वाढ कशी होत असते, हें पहा. एके वेळीं बरी म्हणून वाटत असलेली स्थिति थोड्या वेळानंतर शिळी आणि वेचव होते ! यावरून बरें आणि वाईट हीं स्वरूप वस्तुतः आपल्या स्वतःच्या मनःस्थितीवर अवलंबून आहेत, असे दिसून येईल. बरें आणि वाईट या कल्पना वस्तुगत नसून आत्मगत आहेत हें यावरून सिद्ध होते; आणि त्याचप्रमाणें बरें आणि वाईट या स्वरूपांत फरक म्हणून जो दिसतो तो त्या पदार्थांच्या वास्तविक गुणधर्मामुळे उत्पन्न झालेला नसून तो फक्त व्यक्ततेच्या कमीअधिक परिमाणामुळे उत्पन्न झालेला असतो हेंही कळतें. तो फरक गुणधर्ममूलक नसून परिमाणमूलक मात्र असतो. जें जें कांहीं व्यक्त- दशेला आलें आहे, तें वस्तुतः आत्म्याचेंच व्यक्तरूप आहे. ज्यावेळी आत्म्याच्या व्यक्ततेचें परिमाण फार कमी असतें, त्यावेळी त्या स्थितीला आपण वाईट, पाप इत्यादि नांवें देतों; आणि ज्या वेळी हें व्यक्तत्व अधिक स्पष्ट असेल त्यावेळीं त्या स्थितीला आपण चांगलें, पुण्य, अशीं नांवें देतों. आत्मा हा या दोन्ही स्थितींच्या पलीकडचा आहे. त्याच्या ठिकाणीं कांहीं चांगले नाहीं आणि कांहीं वाईटही नाहीं. याकरितां विश्वांत जें जें कांहीं आहे, तें सर्व चांगलेच आहे, अशा भावनेचें चिंतन करावें. कारण, कोणतेंही रूप झाले तरी तें त्या पूर्णांचेंच प्रतिबिंब आहे. तो पूर्ण आहे याकरितां तो बरा नाहीं आणि वाईटही नाहीं. तो पूर्ण आहे आणि पूर्ण वस्तु एकच असूं शकेल: चांगलें अनेक असूं शकेल आणि वाईटही अनेक असूं
 स्वा. वि. सं. ३-१३०