पान:विवेकानंद.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

प्रकृतीशी तादात्म्य पावत नाही. स्वयंपूर्ण असल्यामुळे तो सुखदुःखातीत आहे. जाणत्याला कोणी जाणावें? कोणत्या साधनांनी त्याचे ज्ञान करून घ्यावें? याला जाणण्याला साधनेच नाहींत. सर्व ऋषींनी सांगितलेला हाच अंतिम सिद्धांत आहे. ज्ञानातीत होणे हाच आत्मानुभवाचा आणि अनंतत्वाचा मार्ग.'
 अस्तित्व म्हणून जें कांहीं आहे, ते एकरूप आहे असे येथे सांगितले आहे. ज्या ठिकाणी लहानमोठे भाग नाहींत, जें अच्छेद्य आहे, ज्याठिकाणी लहान आणि मोठे या क्षुद्र आणि मृगजलवत् कल्पना संभवतच नाहीत, असे ते विशिष्ट अस्तित्व आहे. त्या अस्तित्वाचे स्वरूप असे आहे तरी पिंडापिंडांतून तेच रूप प्रतीत होत आहे. व्यक्तिमात्राच्या ठिकाणी त्याच अस्तित्वाचे प्रकाशकिरण व्यक्त होत आहेत. प्रत्येक वस्तु त्याच आत्मरूपाचे व्यक्तस्वरूप आहे. या मूळरूपापर्यंत कसे पोहोंचावयाचें ? महर्षि याज्ञवल्क्यांनी आपणांस आरंभींच असे सांगितले आहे की, प्रथम याबद्दल ऐकून घ्या, मग त्यावर विचार करा आणि नंतर त्याचेच सदैव चिंतन करा. या विश्वांत जें जें कांहीं आपण पाहतों अथवा जाणतो, त्या सर्वांत मूलतत्त्व आत्मा हेच आहे, असे येथवर सांगितले आहे. नंतर आत्मरूपाचे अनंतत्व आणि मानवी मनाचे समर्यादत्व यांचा विचार करून समर्यादानें अमर्यादाला-अनंताला-जाणणे सर्वथा अशक्य आहे, असा सिद्धांत श्रीयाज्ञवल्क्यांनी सांगितला आहे. आतां, अनंताला जाणणे आम्हांस जर सर्वथा अशक्य आहे तर पुढे आम्ही काय करावे ? याज्ञवल्क्य म्हणतात की, जरी त्याला जाणतां आलें नाहीं, तरी त्याचा अनुभव होईल; आणि हे सांगत असतां त्यांनी चिंतनविचारही सांगितला आहे. हे सारे विश्व व्यक्तीला मदत करीत आहे आणि व्यक्ति ही विश्वाला मदत करीत आहे. कारण, त्यांचा अन्योन्यसंबंधच तसा , आहे. यांतील एकाची उत्क्रांति दुस-याच्या उत्क्रांतीला मदत करते; पण आत्मा स्वयमेव प्रकाशक असल्यामुळे त्याला प्रकाश देणारा दुसरा कोणीही असणे शक्य नाहीं हे उघडच आहे. जो स्वयंपूर्ण आहे, त्याला आणखी निराळे पूर्णत्व ते कोण आणि कसे देणार ? आत्मा स्वयमेव आनंदरूप आहे; आणि या सुखरूपतेचे कितीही ग्राम्यरूप आढळले, तरी तेही त्या आनंदरूपाचेंच प्रतिबिंब आहे. जे कांहीं ‘चांगलें' म्हणून आपणांस वाटते ते त्याचेच प्रतिबिंब आणि तेच प्रतिबिंब अधिक संकुचित झाले म्हणजे त्याला आपण