पान:विवेकानंद.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.

वेदांतमताचे सामान्य निरीक्षण.

होतो तो नष्ट होतो, हेही खरे. याकरितां मायेचे स्वरूप अनिर्वचनीय आहे, असा अद्वैतमताचा सिद्धांत आहे. याकरितां माया हीच या विश्वभासाचे कारण आहे. ब्रह्म सत् असल्यामुळे प्रत्येक वस्तूचे ते अधिष्ठान आहे. त्या वस्तूंतील ‘असणेपणा' ब्रह्मामुळे आहे. तसेच ही वस्तु अमुक' असे नाम-रूप मायेमुळे त्या असणेपणाच्या ठिकाणी भासते. नाम-रूपामुळे त्या वस्तूस विशिष्टत्व व निराळेपणा प्राप्त होतो. अशा रीतीने एकाच सत् वस्तूवर मायेमुळे अनेक नाम-रूपांचा आरोप होऊन ही चराचर सृष्टि भासमान् झाली आहे. प्रत्येक जीवात्मा वेगळा आहे या कल्पनेस अद्वैत सिद्धांतांत थारा नाहीं ही गोष्ट आतां आपल्या लक्ष्यांत आलीच असेल. प्रत्येक जीवात्मा वेगळा दिसतो याचे कारण माया आहे असे अद्वैतमताचे ह्मणणे आहे. जर सारें अस्तित्व केवळ एकरूपच आहे तर 'मी, ‘तो, ‘तू, या द्वैत कल्पनांस थारा कोटें राहिला ? आपण सर्व वस्तुतः एकरूपच आहों. द्वैत कल्पनांचा उदय झाला की ‘मी’ ‘तो’ ‘तू' यांचा उदय होतो आणि यांच्या उद्याबरोबरच दुर्गुणैकमूर्ति सैतानाचाही जन्म होतो. जगांत जें जें कांहीं ‘वाईट' या विशेषणाने ओळखले जाते त्या त्या प्रत्येकाचें मूळ द्वैतभावांतच आहे असे तुह्मांला निःसंशय आढळून येईल. 'मी अमुक' असा क्षुद्र द्वैतभाव स्वतःबद्दल माझ्या मनांत उत्पन्न झाला की त्याच क्षणीं बाह्य सृष्टीशी माझी ताटातूट होतेबाह्य सृष्टीपासून मी अलग होतो. असे झाले ह्मणजे भीतिही लगेच माझ्या हृदयांत प्रवेश करते. जेथे भीतीनें प्रवेश केला तेथे दुःखही यावें हें रास्तच आहे.
 हा, तो, तू, मी इत्यादि भावना क्षुद्र आणि आकुंचित आहेत. ज्या भावनेत असल्या प्रकारची द्वंद्वे उरली नाहींत तीच भावना अत्यंत विशाल-सर्वव्यापक-असून परमात्म्याचे रूपहि तेच आहे. आकुंचित भावना दुःखाचे माहेरघर असून सर्वव्यापी भावना हें सुखाचे वसतिस्थान आहे.
  विश्वांतील वस्तूंत जी नाना रूपे आणि नाना नामें प्रतीत होतात ही सर्व क्षणभंगुर असून मनुष्यप्राण्याचे खरे स्वरूप त्यांमुळे आच्छादित झाल्यासारखे दिसते. तथापि या आच्छादनाचे स्वरूप चिरस्थायी नाहीं हें लक्ष्यांत ठेवलें पाहिजे. या आच्छादनामुळे मनुष्यप्राण्याचे खरे स्वरूप वस्तुतः मुळीच बदलत नसून ते बदलल्यासारखा भास होतो. अत्यंत क्षुद्र जंतूपासून अत्यंत बुद्धि