पान:विवेकानंद.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन--प्रकरण ५ वें.

१८५


वस्तूला तो 'नेति' ह्मणतो. प्रत्येक वस्तूचा अशा रीतीने पूर्ण ग्रास झाल्या- वर शेवटीं जें काय उरतें, तें तो स्वतःच उरतो. प्रत्येक वस्तूचें पृथक्करण करून त्यांतील 'आत्मा' शोधण्याची ही क्रिया आहे. प्रत्येक वस्तूचा उच्छेद कराव- याचा आणि अशा रीतीने सर्व विश्वाचें पृथक्करण करून त्याला स्वतःपासून दूर करावयाचें हाच ज्ञान्याचा मार्ग. 'मी ज्ञानी आहे' ही भाषा बोलण्याला फार सोपी आहे, पण ज्ञानी होणें मात्र कठीण आहे. "फुकाचें मुखीं बोलतां काय वेंचे ?” “क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया | दुर्गं पथस्तत्कवयो वदंति ॥” ( कठोपनिषत् १. ३. १४). तीव्र धार दिलेल्या वस्तऱ्यावरून चालणे आणि ज्ञानी होऊं पाहणें, हीं कर्मे सारखींच सोपी आहेत; तथापि भिऊं नका, धीर सोडूं नका. “ उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान्निबोधत । " असा उपदेश उच्च घोषानें श्रुति करीत आहे.
 मन आणि देह या क्षुद्र कल्पनांचा सर्वस्वी त्याग ज्ञान्याला कर्तव्य आहे. मग त्यानें कशाचें चिंतन करावें ? 'मी स्वामी' इतकी कल्पना माझ्या चित्तांत आल्याबरोबर 'मी देह' असें वाटू लागतें. त्याचवेळीं मनाला जबर टोला दिला पाहिजे आणि त्याला बजावले पाहिजे कीं 'तूं देह नाहींस; तूं आत्मरूप आहेस.' शरिराला शेंकडों रोगांनी घेरलें, तरी त्याची काळजी कोण करतो ? अत्यंत अक्राळविक्राळ रूप घेऊन मृत्यु पुढें येऊन उभा राहिला, तरी त्याकडे आह्मी ढुंकूनही बघणार नाहीं. मी देह नव्हें. मग या देहाला नटवावयाचें आणि सजवावयाचें कशाला ? त्या जुन्या स्वप्नाचें सुख पुन्हा भोगण्याची इच्छा आहे काय ? त्या गुलामगिरीच्या चिखलांत पुन्हा लोळण्याकरितां ? नको, नको. त्याचें आतां नांव काढू नका. मी देह नव्हें. ज्ञान्याचा मार्ग हाच.
 भक्त ह्मणतो, ' हें शरीर मला ईश्वराने दिलें. याच्या साहाय्यानें संसार- समुद्रांतून मी तरून जावें हाच त्याचा उद्देश आहे. याकरितां हा समुद्र पार होईपर्यंत मला त्याचें संरक्षण केले पाहिजे.'
 योगी ह्मणतो, 'याच देहांत अनंतशक्ति वास करीत आहे. ती पूर्ण जागृत होईपर्यंत मला त्याला जपले पाहिजे. '
 पण ज्ञान्याला इतका वेळ थांबण्याला फुरसुदच नाहीं. याच क्षणी त्याला मुक्ति पाहिजे. त्याचें चिंतन एकच. ' मी सदैव मुक्त आहे. मी बद्ध केव्हांच नव्हतों. मी सदैव या सृष्टीचा परमात्मा आहे. मग मला पूर्णत्व देणारा दुसरा कोण असणार ? मी आतांच पूर्ण आहे.'