पान:विवेकानंद.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


लागल्याचा भ्रम दृष्टीला होतो. वस्तुतः सूर्य एकाच जागी असतो. त्याचप्रमाणे ही माया ढगासारखी असून तुम्ही स्वतः सूर्यासारखे स्थिर आहां. मायेच्या चंचलतेचा आरोप स्वतःवर केल्यामुळे आपण जातो आणि येत असे आपणास वाटते. वास्तविक आपण जात नाहीं अथवा येतही नाही. त्या स्थिररूपाकडे बाह्यविश्वांतून अवलोकन केले म्हणजे त्याला आपण परमेश्वर म्हणतों आणि हीच दृष्टि स्वतःकडे वळविली म्हणजे तेच स्थिररूप 'मी' या रूपाने दिसते. दोन्हीं रूपें एकच. एकाच रूपाचे हे दोन प्रकार आहेत. तुमच्याहून अगदी भिन्न असा परमेश्वर म्हणून कोणी प्राणी नाही. तसेच तुमचे जें वास्तविक निश्चलरूप आहे, त्याहून उच्च प्रतीच्या स्वरूपाचा असाही कोणी नाही. सर्व प्रकारचे देव म्हणजे तुम्हीच उत्पन्न केलेले लहान लहान प्राणी आहेत. ‘आकाशस्थ पिता' आणि इतर कल्पनात्मक देव, हीं तुम्हींच स्वतःच्या कल्पनेने काढलेली चित्रे आहेत. परमेश्वर म्हणजे तुमचीच प्रतिमा. * परमेश्वराने स्वत:च्या मूर्तीबरहुकूम मनुष्य घडविला,” ही ख्रिस्ती शास्त्रांतील उपपत्ति सर्वथा चुकीची आहे. त्या ठिकाणी * मनुष्याने स्वत:च्या मर्तीबरहुकूम परमेश्वर बनविला' असे पाहिजे. हीच शास्त्रीय उपपत्ति आहे. आपणच या सा-या विश्वभर अनेक देव निर्माण करीत असतो. परमेश्वराला निर्माण करून आपण त्याच्या पायां पडतो आणि त्याची पूजा करतो. हें परमेश्वराचे स्वप्न आपण निर्माण करतो आणि त्यावरच आपले प्रेम जडते. इतका वेळ ज्या अनेक गोष्टींचे विवेचन आपण केले, त्यांत ध्यानात ठेवण्याचा मुख्य मुद्दा हाच की, अस्तित्व म्हणून जें कांहीं आहे ते एकच आहे; त्या एकाच अस्तित्वाकडे निरनिराळ्या भिंगांतून आपण पाहतो आणि त्याला पृथ्वी, स्वर्ग, नरक, परमेश्वर, पिशाच, मनुष्य, राक्षस व दुसरीही कित्येक नांवें आपण देतो. ही सारी आपण निर्माण केलेली सृष्टि आहे. तथापि * नित्योऽनित्यानां चेतनश्चेतनानाम् । एको बहूनां यो विदधाति कामान् । तमात्मस्थं येऽनुपश्यति धीरास्तेषां शांतिः शाश्वती नेतरेषाम् ॥ ( कठोपनिषत् ५. १३. ). अनित्य अशा सगळ्या वस्तुजातांतील नित्यतत्त्व जो पाहतो, मृत्युवश अशा या विश्वांतील एकरूप चैतन्याचा अनुभव जो घेतो, या अनेकांना तृप्ति देणाच्या एकाला जो स्वत:च्या अंतयमी जाणतो, त्यालाच शांति माळ घालते; इतर कोणालाही नाहीं. जें