पान:विवेकानंद.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

प्रत्यक्ष अनुभव कसा होतो अशी शंका येथे उद्भवते. याचे उत्तर सर्परज्जुन्यायाने अद्वैतवाद्यांनी दिले आहे. अर्धवट उजेड असलेल्या जागी दोरीचा तुकडा पडला असतां तो सर्प आहे असा भास होऊन तो भीतिप्रद होतो. वास्तविक दोरीने सर्पाचे रूप घेतलेले नसतांही केवळ भ्रमानें ज्याप्रमाणे सर्पदर्शनाइतकी भीति वाटते, त्याचप्रमाणे ब्रह्म केवलरूप असतांहि त्याच्याठिकाणीं विश्वाचा आविर्भाव होतोसा दिसतो. देश, काल आणि निमित्त अथवा नाम आणि रूप या उपाधींच्या योगानें ब्रह्म अनेकधा नटलें आहे असा भ्रम उत्पन्न होतो. नाम आणि रूप या उपाधींमुळेच ही वस्तु अमुक’ आणि ‘ती तमुक' अशी भेददृष्टि उत्पन्न झाली आहे. नाम-रूपाची कल्पना सर्वथा नष्ट झाली तर भेददृष्टि नाहीशी होऊन सर्वत्र एकच केवलरूप आहे असा अनुभव येईल. भ्रमकाली दोरीवर सर्पाचा भास होतो, वे भ्रमनिरास झाला म्हणजे सर्प दिसेनासा होतो. या ठिकाणी सर्पाची उत्पत्ति केवळ भ्रमरूप आहे. वास्तविक पाहतां दोरीने सर्पाचे रूप केव्हांही घेतले नव्हते अथवा भ्रमनिरासानानंतर सर्प नष्ट झाला असेही नाही. या ठिकाणी नवीन कांहींच उत्पन्न अगर नष्ट झाले नसतांही सर्प उत्पन्न झाला आणि नष्ट झाला अशा दोन्ही क्रिया झाल्याचा प्रत्यय आल्यासारखा वाटतो. त्याचप्रमाणे विश्व निर्माण होत नसतां अथवा नष्ट होत नसतांही केवळ अज्ञानामुळे विश्वाचे अस्तित्व आहे असा भ्रम उत्पन्न होतो, आणि हा भ्रम शिल्लक असेपर्यंत ब्रह्मानुभव होत नाहीं. सर्प आहे असे वाटत आहे तोपर्यंत भीति नष्ट होत नाही, तसेच हे आहे. सर्पभ्रमाचा निरास झाला ह्मणजे ज्याप्रमाणे खरी दोरी दिसते आणि सर्प नाश पावतो त्याचप्रमाणे अज्ञान नष्ट झाले ह्मणजे ब्रह्मानुभव होऊन विश्वाचे अस्तित्व भासेनासे होते. केवलरूप वस्तूच्या ठिकाणी असा भ्रम कां उत्पन्न होतो या प्रश्नाचे उत्तर अद्वैतमताने मायावादाने दिले आहे. माया ह्मणजे अज्ञान हेच या सा-या भ्रमाचे कारण आहे. या मायेला सत्य अथवा मिथ्या असे कांहीं निश्चित स्वरूपच नाहीं. ती आहे असेही ह्मणतां येत नाहीं अथवा ती नाहीं असेंही निश्चयाने सांगवत नाही. कारण तिला निश्चयात्मक अस्तित्व असते तर ती कधी नष्ट झालीच नसती. अस्तित्वाचे नास्तित्व होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तिला मुळीच अस्तित्व नसते तर तिजमुळे भ्रमहि उत्पन्न झाला नसता. पण भ्रम होतो हे खरे आणि त्याचा निरास