पान:विवेकानंद.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ५ वें.

१७७

किमपि सततबोधं केवलानंदरूपम्


निरुपममतिवेलं नित्यमुक्तं निरीहम् ।'


निरवधि गगनाभं निष्कलं निर्विकल्पम्


हृदि कलयति विद्वान् ब्रह्म पूर्ण समाधौ ॥


( विवेकचूडामणि ४१० )


 कोणी कोणी असा प्रश्न करतात की, “कायहो, स्वर्गलोक, नरकलोक आणि इतर पुष्कळ प्रकारचे लोक यांची वर्णने सर्व धर्मात केली आहेत. त्यांजबद्दल तुमचे काय म्हणणे आहे ? कांहीं ठिकाणी असे सांगितले आहे की मनुष्य मेला म्हणजे तो स्वर्गात अगर नरकांत जातो; त्याला तेथे दुसरा देह प्राप्त होतो; आणि तेथे तो आपल्या ब-यावाईट कर्माची फळे भोगतो." यावर आम्ही अद्वैतवादी अगदी सरळ भाषेने असे सांगतों कीं, हे सारे भ्रम आहेत. वस्तुतः कोणी जन्मासही येत नाही आणि मरतही नाही. स्वर्गलोक आणि नरकलोक यांना भ्रमिष्ट डोक्यावांचून दुस-या कोठे अस्तित्व नाहीं; आणि या जगालाही वस्तुतः अस्तित्व नाहीं. या तिहींपैकी एकालाही खरोखर अस्तित्व नाहीं. एखाद्या मुलाला भुतांच्या खूपशा गोष्टी तिखटमीट लावून सांगितल्या आणि रात्री त्याला रस्त्यावर एकटें धाडले, तर एखाद्या मोडलेल्या झाडाचे बंधकें पाहिल्याबरोबर 'अरे, भूत!' म्हणून तो ओरडेल. त्या भुताला हातपाय असून, ते आपल्याला धरण्यास येत आहे असेही तो म्हणेल. एखादा मनुष्य रात्रीच्या वेळी आपल्या प्रियपात्राला भेटावयाला जात असला, तर तेच बंधकें त्याला स्त्रीसारखे दिसेल. एखाद्या पोलीस शिपायाला तेच बुंध चोर आहेसे वाटेल; उलटपक्षी एखाद्या चोराला ते पोलीस शिपायासारखे दिसेल. झाडाचे बंधके एकच असतां निरनिराळ्या मनोवृत्तींना ते निरनिराळे भासते. या नानाप्रकारच्या आभासांत सत्यरूप बुध एकस्वरूपच होते. त्याच्या स्वरूपांत कोणत्याही प्रकारचा बदल नव्हता. निरनिराळ्या मनांनी त्यावर निरनिराळ्या रूपांचा आरोप केल्यामुळे, त्या एकरूपाची इतकीं अनेक रूपे झाली. त्याच. प्रमाणे एकच स्वरूपाचें ब्रह्म सर्वत्र व्यापून राहिले आहे. ते कोठे जात नाहीं अथवा कोठून येतहीं नाहीं. एखाद्या मनुष्याने स्वर्गसुखाची वर्णने ऐकली म्हणजे त्यालाही स्वर्गसुखाची इच्छा उत्पन्न होते. सर्व वेळ तो याच गोष्टीचे चिंतन करतो. काही काळाने त्याच्या चालू ऐहिक स्वप्नाची समाप्ति होते व दुस-या
 स्वा. वि. खं. ३-१२.