पान:विवेकानंद.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


आणि दोरी दिसली, ह्मणजे सर्प दिसेनासा होतो. यांपैकी कोणते तरी एकच एका वेळी पाहणे आपणांस शक्य आहे. ज्यावेळी सर्प दिसत होता, त्यावेळी तिचे दोरी में स्वरूप आपणांस दिसत नव्हते; आणि त्याच वस्तूचे दोरी में स्वरूप दिसू लागतांक्षणींच, सर्प कोठे नाहीसा झाला. भ्रमकालीं दिसत असलेलें रूप सत्यदर्शनाच्या काळी दिसत नाही. आपण असे समजू कीं, संध्याकाळच्या वेळी थोडथोडा अंधार आणि धुके पडत असतां आपण आपला एखादा स्नेही दुरून येतांना पाहिला. तो गृहस्थ आपला स्नेही असल्यामुळे आपल्या चांगल्या ओळखीचा आहे; परंतु अस्पष्टपणामुळे तो दुसराच कोणी असावा असे वाटलें. ज्यावेळी तो दुसराच कोणी असावा असे वाटते, त्यावेळी आपला स्नेही आपण पाहत नसतो. आपल्या स्नेह्याचे नांव 'अ' आहे असे असमजू. ज्यावेळीं ‘अ’ ला न ओळखल्यामुळे आपण त्याला 'ब' समजतों, त्या वेळी 'अ' ला जणुंकाय अस्तित्वच नसते. याचप्रमाणे प्रत्येक वेळीं प्रत्येक वस्तूचे एकच स्वरूप आपणांस दिसत असते. देहबुद्धि पक्की आहे तोपर्यंत आत्म्याचे स्वरूप देहमय आहे, इतकाच प्रत्यय असतो. एकंदर मनुष्यजातीपैकी बहुतेकांना, देह हाच आत्मा वाटत असतो. मन, बुद्धि, आत्मा इत्यादिकांबद्दल वेळीं अवेळी कितीही गप्पा त्यांनी सांगितल्या, तरी त्यांचा अनुभव शब्द, स्पर्श, रूप इत्यादि जड गुणांपलीकडे गेलेला नसतो. आपले खरे स्वरूप केवळ विचारमय-मनोमय-आहे, असा अनुभव कांहीं थोड्यांना क्वचित् प्रसंगी होत असतो. सर हंफ्रे डेव्ही याची एक गोष्ट आपण बहुधा ऐकली असेलच. एकेवेळी आपल्या विद्यार्थ्यांसमोर तो हास्यवायूसंबंधीं कांहीं प्रयोग करीत असतां, तो वायु भरलेली एक नळी फुटली आणि तो वायु त्याच्या नाकांत शिरला. त्यामुळे त्याला गुंगी आली आणि तो थोडा वेळ अगदीं निश्चेष्ट स्थितीत राहिला. तो शुद्धीवर आल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना ह्मणाला, “सारे जग ह्मणजे निवळ कल्पनांचे जाळे आहे; याहून अधिक त्यांत कांहीं नाहीं.' त्या वायूच्या गुणाचा जोर शिल्लक होता, तोपर्यंत त्याची देहबुद्ध नष्ट झाली होती. यामुळे जगाचे जे स्वरूप त्याला तोंपर्यंत जड असे वाटत होते, तेच स्वरूप कल्पनामय-मनोमय-आहे असे त्याला वाटले. हीच जाणीव याहून अधिक मोठी भरारी मारून पुढे गेली, तर जड आणि मनोमय अशी दोन्ही रूपें मागे पडून खरें रूप-केवलरूप-दिसू लागेल. सर्व विश्व ह्मणजे ‘सच्चिदानंद' हुँच; याहून अन्य कांहीं नाहीं; असा अनुभव येईल,