पान:विवेकानंद.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ५ वें.

१७५


मनाच्या द्वारे त्याजकडे अवलोकन केले, ह्मणजे ते विकारमय आणि कल्पनामय आहे, असा त्याजबद्दल अनुभव येतो. या दोन्ही प्रकारच्या इंद्रियांचा त्याग केला ह्मणजे ते जसे वस्तुत: आहे, तसाच त्याचा अनुभवही येईल. हा अनुभव ह्मणजे सर्वत्र ते एकरूपच भरले आहे, हा होय. आपण एक तत्त्व नित्य लक्ष्यांत बाळगले पाहिजे, ते हें कीं, ‘प्रत्येक मनुष्याचा जीवात्मा स्वतंत्र आहे असें नाहीं.' चालू विषयाच्या समजुतीकरितां कित्येक ठिकाणी त्याचा तसा उल्लेख केला आहे हे खरे; तथापि वास्तविक अस्तित्व एकच असून, एकच पुरुष-एकच आत्मा-इंद्रियद्वारा देहमय भासतो; तोच विचारद्वारा मनःस्वरूप भासतो; आणि उपाधिरहित पाहिला असता, तोच आत्मा केवलरूप आहे असा अनुभव येतो. आपल्या या एकाच पिंडापुरता विचार केला, तरी त्यांत देह, मन आणि आत्मा असे तीन प्रकार वास्तविकपणें नाहींत. विषयाच्या समजुतीकरितां तसे भाग कल्पिणे इष्ट आहे, इतकेच. जे एकच रूप सर्वत्र भरले आहे, त्यालाच परिस्थित्यनुरूप देह, मन आणि आत्मा अशा संज्ञा प्राप्त होतात. सर्वत्र एकच अस्तित्व असतां, केवळ अज्ञानी लोक त्याला जग या नांवाने ओळखतात; याहून उच्च प्रतीची माणसे असतात त्यांना जग विचारमय दिसते; आणि ज्यांना पूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे व त्यामुळे ज्यांचा भ्रमनिरास झाला आहे, त्यांना सर्वत्र अखंड असे एकरूपच दिसते. * अहं ब्रह्मास्मि” हा शेवटचा सिद्धांत आहे. जगांत तीन रूपें नाहींत आणि दोनहीं नाहींत. जें कांहीं आहे ते एकच आहे. अर्धवट उजेडांत दोरी पडली असता ती ज्याप्रमाणे सपसारखी दिसते, त्याचप्रमाणे मायेच्या आवरणामुळे, एकच अनेकतेने भासत आहे. दोरीच्या तुकड्यावरच सर्पाचा भास होतो, त्यावेळी दोरी निराळी आणि सर्प निराळा असा कांहीं भाग नसतो. एकच तुकडा, दृष्टिभ्रमामुळे दोरी आणि सर्प अशा दुहेरी स्वरूपाचा दिसतो. द्वैत आणि अद्वैत हे दोन शब्द, केवळ बुद्धीच्या पकडी दाखविण्याच्या उपयोगी आहेत; पण आपणापाशीं अशी द्विधादृष्टीच नाही. आपण सारे जन्मतःच अद्वैती आहों; कारण, कोणत्याही गोष्टीचे एका वेळी एकच स्वरूप आपल्या दृष्टीस दिसते. एखाद्या गोष्टीचे खरे आणि खोटें अशी दोन्ही स्वरूपें एकाच वेळी आपणांस कधीही दिसत नाहीत. आपण निसर्गत:च अद्वैती आहों, याला कांहीं उपाय नाहीं. ज्यावेळी आपण सर्प पाहतों, त्यावेळी दोरी आपणांस दिसत नाहीं,