पान:विवेकानंद.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


तरी हा विषय अत्यंत उपयुक्त आहे हेच सिद्ध होते. शक्य तितक्या उच्च प्रतीचे सुख मिळविणे असेल, तर धर्ममार्गाशिवाय ते मिळणे शक्य नाहीं. इंद्रियजन्य सुख मिळवून देणारी कितीही साधने एखाद्याने जमा केली, तरी ती साधने अत्यंत उपयुक्त आहेत असे ह्मणतां येणार नाहीं; कारण, ज्ञानावांचून इतर सर्व सुखें तुच्छ आहेत. स्वतःच ज्ञानमय होणे, हे आपलें अखेरचे साध्य आहे. अत्यंत सुखी होण्याला, त्यावांचून अन्य साधनच नाहीं. गाढ अज्ञानांत राहून जीं मनुष्ये कमें करीत असतात, ती खरोखर केवळ बुद्धिबळांसारखी असतात, असे ह्मणावयास हरकत नाही. केवळ हातापायांनी काम करणे इतकेच मनुष्यत्वाचे लक्षण नाहीं. यंत्रे सदोदित कार्यरत असतात, हे आपण नित्य पाहतोच; पण त्यांनी केलेल्या कामाचा उपयोग जसा भलत्यालाच होतो, त्याचप्रमाणे अज्ञानी मनुष्यांच्या जिवावर तिसरैच सुख भोगतात. मानवी आयुष्यक्रमांत मिळणारा सुखाचा वांटा, अज्ञानी मनुष्याच्या पदरीं कधीही पडत नाही. त्या सुखाचा, खरा भोक्ता ह्मटला ह्मणजे ज्ञानी हाच होय. एखाद्या कुबेराने एक लाख रुपये खर्चुन एखादं सुंदर चित्र खरेदी केले, तरी त्या चित्रांतील मर्म जाणण्याचे ज्ञान ज्याला असेल त्यालाच त्याच्या दर्शनापासून वास्तविक आनंद होईल. त्या कुबेराला चित्रकलेचे मर्म जाणण्याची पात्रता नसली, तर त्या चित्राचा तो भोक्ता आहे असे ह्मणतां यावयाचे नाही. त्याने द्रव्य खर्च केले त्या अर्थी, तो त्या चित्राचा मालक झाला हे खरे; तथापि त्याचा भोक्ता भलताच कोणी होईल. आपण साच्या जगभर हिंडूने पहा, आपणांस सर्वत्र एकच नियम आढळून येईल; तो हा कीं, लौकिक सुखाचाहीं खरा भोक्ता शहाणा पुरुषच असतो. अज्ञानी मनुष्यांनी बैलासारखें काम मात्र करावे; सुख त्यांच्या नशिबी लिहिलेलेच नसते. त्यांनी केलेल्या कामाचा उपयोग ज्ञान्यालाच होतो. पुष्कळ वेळां ही गोष्ट अज्ञानी मनुष्यांच्या लक्ष्यांत येत नाहीं; पण हा नियम सर्वत्र एकसारखा लागू पडतो हे मात्र खरे.असो.
 एकच पुरुष-आत्मा-सर्वत्र भरून राहिला आहे आणि एकाहून अधिक आत्म्यांना अस्तित्व असणे शक्य नाहीं; या अद्वैतमताचा विचार येथवर केला. अस्तित्व ह्मणून जे काहीं आहे, ते एकच आहे व इंद्रियद्वारा आपण त्याजकडे पाहिले ह्मणजे तेच अस्तित्व विश्वरूप दिसते हेही आपण पाहिलेंच आहे. जड इंद्रियांच्या द्वारा त्याचा अनुभव घेतला, तर ते जड आहेसे भासते;