पान:विवेकानंद.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२।
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

प्रकरण ५ वें.


एक तेच अनंत.


 योगांचे प्रकार अनेक असले, तरी त्यांपैकी प्रत्येकांत वैराग्याची आवश्यकता किती आहे, याचा विचार आपण केलाच आहे. ब्रह्मानुभवाच्या मार्गातील पहिला महत्त्वाचा मुक्काम, वैराग्य हाच आहे. संसारी आणि कर्मसंगी मनुष्याने कर्मफलत्याग करणे अवश्य आहे. वैराग्य अंगी बाणण्याकरितां कर्मफलत्याग करण्याचा अभ्यास करावा. जो भक्त असेल, त्याने अव्यभिचारी भक्ति करणे हेच त्याचे वैराग्य. सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान् अशा प्रेममयाचे सदैव चिंतन करणे, हेच त्याला योग्य आहे. त्याचे चित्त इतर कसल्याही वस्तूबद्दल चिंतन करू लागले, तर भक्तीत व्यभिचार होतो हे लक्ष्यांत ठेवून त्यानें क्षुद्र प्रकारच्या सर्व ममतांचा त्याग करावा. हे भक्ताचे वैराग्य. राजयोगाचा मार्ग ज्याला पसंत असेल, त्याने विश्वशक्तींच्या अनुभवांचा त्याग करावा. त्याने अभ्यासाला सुरवात केली ह्मणजे विश्वशक्तींचे नानाप्रकारचे अनुभव त्याला प्राप्त होऊ लागतात. या एकेका अनुभवाचा त्याग करून त्याने पुढे जावे. हे सर्व विश्व जरी पुरुषाच्या अनुभवाकरितांच निर्माण झाले आहे, तरी पुरुष विश्वांतर्गत नसून तो विश्वशक्तींच्या बाहेरचा–पलीकडचाआहे, हा शेवटचा अनुभव मिळविण्याकरितां राजयोग्याची सारी खटपट असते. हा अनुभव प्राप्त होईपर्यंत, मध्यंतरी कोठेही मुकाम न करण्याचा निश्चय त्याने केला पाहिजे. याकरितां सर्व प्रकारच्या क्षुद्र अनुभवांचा त्याग त्याने करावा. ज्ञानयोग्याने तर आरंभीच सर्व वस्तूंचा त्याग केला पाहिजे. कारण, या विश्वाला वस्तुतः अस्तित्वच नाही, हा त्याचा शेवटचा सिद्धांत आहे. विश्वाला पूर्वी कधीं अस्तित्व नव्हते, सध्या नाहीं आणि पुढे कधी असणारही नाहीं. हा सिद्धांत चित्तांत बाणण्याकरितां, सर्व भ्रमांचा-वस्तूंचा-त्याग त्याला अवश्य आहे.
 धर्ममार्गाचा उपयोग व्यवहारांत कितपत होईल असा प्रश्न विचारणे मूर्खपणाचे आहे, याचे विवेचनही आपण पूर्वी केलेच आहे. उच्च आणि शुद्ध वातावरणांत भराच्या मारण्याची इच्छा करणारांनीं, अशुद्ध आणि जड वातावरणाचा विचारही मनांत आणणे अयोग्य आहे. धर्माचा उपयोग व्यवहारांत