पान:विवेकानंद.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ४ थे.

१७१


इच्छा असते. कसल्याही प्रकारच्या स्थितीबद्दल कुरकुर न करतां स्वस्थ असावयाचे, याचें नांव तितिक्षा. 'मला सुख नको, दुःख नको, सद्भुण नकोत, दुर्गुण नकोत, थंड नको, उष्ण नको, या द्वंद्वांतील कांहींच मला नको; मी केवलरूप आहे; विश्वाशीं मला काय कर्तव्य आहे ?' असे म्हणणारी माणसे मी पाहिली आहेत. शरीरसुखाकरितां कसलाच उद्योग न करणे, याचे नांव तितिक्षा. सध्याचा धार्मिक मनुष्य काय करीत असतो ?: तो प्रार्थना करतो आणि म्हणतो, “परमेश्वरा, मला अमुक दे आणि तमुक दे." हा काय धर्म झाला ? मौख्यस्खलितमिदम् ! असल्या भिकार प्रार्थनांना आणि उपासनांना जे धर्म समजतात, त्यांना ईश्वर आणि आत्मा यांबद्दल कांहीं कल्पनाच नाहीं, असे आपण समजा. माझ्या सद्गुरूंनी एके वेळी म्हटले, * घार आकाशांत इतकी उंच जाते, की ती एका लहानशा ठिपक्याएवढी दिसते; पण तेथून तिचे डोळे, सडकें ढोर कोठे पडले आहे याकडे लागलेले असतात. तुमच्या सगळ्या धर्मकल्पना एकत्र शिजवून त्यांचा अर्क काढला, तर काय निष्पन्न होते ? रस्ते साफ ठेवणे, खूप खाणे आणि चांगले कापडे घालणे; झालें; यांत सर्व धर्म आला. हा धर्म नव्हे. अन्नाची आणि कपड्याची पर्वा कोण करतो ? सवा लक्षाची घडामोड रोज सुरू आहे; त्यांत हातभर अलीकडे काय आणि वीतभर पलीकडे काय ? या बिंदुवत् जगांत कोंडून घेऊन, त्यांतील क्षुद्र सुखाच्या इच्छेनें लाळ कोण घोटावी ? त्याच्या क्षणोक्षणीं पालटणाच्या रंगांबरोबर खेळत कोणीं बसावें ? छाती असेल, तर या कोंडवाड्याच्या भिंती फोडून बाहेर पडा. चला; ह्या विश्वाच्याबाहेर, ह्या मायेच्याबाहेर, आणि ह्या कायद्यांच्या बाहेर चला. म्हणा, ‘चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम्' !!