पान:विवेकानंद.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ]

वेदांतमताचें सामान्य निरीक्षण.

षदांचा रोख पाहिला तर ती जणं काय एकाच प्रश्नाच्या उत्तराकरितां खटपट करीत आहेत असे वाटते. जें कांहीं जाणले असतां, जाणण्यासारखें कांहींच उरत नाहीं असें ज्ञान कोणते या एकाच प्रश्नाच्या उत्तरासाठी सर्व उपनिषदें निर्माण झाली आहेत. एक शीत जाणले असतां ज्याप्रमाणे खंडीभर भाताचें ज्ञान होते त्याचप्रमाणे जें एक जाणलें असतां या सृष्टिच्या कोड्याचा अत्यंत समाधानकारक उलगडा होईल असे एक काय आहे याच्या शोधांत सर्व उपनिषदें गुंतली आहेत. ज्यांतून हे सर्व विश्व निर्माण होऊन अनेक प्रकारांनी प्रतीत झाले आहे त्या अनेक प्रकारांस सामान्य असें मूलरूप कोणते हे ठरविण्यासाठी अद्वैतमताचा जन्म झाला आहे. हे मूलरूप सांपडले म्हणजे विश्वाचे आमूलाग्र अवलोकन झाले असे म्हणावयास हरकत नाही. विश्व जरी अनेक रूपांनी नटल्यासारखे दिसत आहे तरी वस्तुतः एकाच अस्तित्त्वानें ही अनेक रूपें धारण केली आहेत असे अद्वैताचे मुख्य प्रतिपादन आहे. प्रकृति म्हणून जें सांख्यतत्त्व आहे ते अद्वैतमतासहि मान्य आहे; पण प्रकृति ही परमात्म्यापासून विभक्त नसून परमात्माच प्रकृतिरूपाने नटला आहे असे अद्वैतमत आहे. विश्व, मनुष्य, जीवात्मा आणि इतर सर्व पदार्थ या रूपांनी सत् हेच दृग्गोचर झाले आहे. बुद्धि आणि महत् ही सुद्धा त्या सत्चींच रूपें आहेत. आतां येथे एक अशी शंका उद्भवते की अद्वैत्यांची सत् वस्तु जर केवलरूप आहे तर तिचे इतक्या प्रकारच्या विश्ववस्तूंत रूपांतर होते हैं कसे ? कोणत्याहि प्रकारच्या विशिष्ट गुणांनीं अगर रूपाने युक्त नसलेले रूप अनेक गुणांनी आणि रूपांनी व्यक्त कसे होते ? या प्रश्नाचे उत्तर अद्वैतवायांनी आपल्या विवर्तवादाने दिले आहे. विर्वत म्हणजे दृश्याभास. दृष्टिभ्रमामुळे भलतेच स्वरूप भासणे यास विवर्त असा अद्वैतमताचा पारिभाषिक शब्द आहे. मूळ प्रकृतीपासून उत्क्रांतीने सध्याची अनेकविध सृष्टि निर्माण झाली आहे असे सांख्यांचे व द्वैतवाद्यांचे म्हणणे आहे. तसेच परमेश्वरापासून ही चराचर सृष्टि निर्माण झाली असे मानणारे कांहीं द्वैतवादी व अद्वैतवादीही आहेत; आणि चराचर सृष्टि ही परमात्म रूपापासून उद्भवलीसे दिसते अथवा भासते असे मत श्रीशंकराचार्यांचे आहे. हे अद्वैतमत आहे. परमात्मा या सर्व सृष्टीचे कारण आहे ही गोष्ट खरी; पण सृष्टि हा केवळ भास आहे. जर विश्व हा केवळ भास असेल तर त्याचा