पान:विवेकानंद.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


वाटत असते. देश-काल-निमित्त या मायेच्या हद्दीत आपण आहों, तोंवर या कायद्यांना अस्तित्व असल्यामुळे त्या हद्दीत स्वातंत्र्य मिळणे शक्य नाहीं. याकरितां आपली सारीं कमें, आपलें परमेशपूजन आणि आपली उपासना, हीसुद्धा मायेच्या राज्यांतीलच आहेत. परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलची आणि मनुष्य व पशु यांच्या अस्तित्वाबद्दलची आपली कल्पना, यासुद्धा मायेंतीलच आहेत; आणि ज्या अर्थी या कल्पना मायिक आहेत, त्या अर्थी त्याही भ्रमरूपच आहेत. ही सारी स्वप्ने आहेत. आतां येथे एक गोष्ट मात्र अवश्य लक्ष्यांत ठेवली पाहिजे. सध्याच्या काळी निरीश्वरवाद्यांचा एक नवाच पंथ निघाला आहे. ईश्वराचे अस्तित्व स्वप्नवत् आहे-तोही एक भ्रम आहे असे ते म्हणतात, पण असे म्हणत असतांही जगाचे अस्तित्व खरे आहे असे त्यांस वाटत असते. ज्या तर्कशास्त्रपद्धतीने ईश्वराचे अस्तित्व ते नाकारतात, त्याच पद्धतीने जगही भ्रमरूप आहे असे सिद्ध होते. या दोन्ही कल्पना एकमेकींशी इतक्या संलग्न आहेत की, त्यांपैकी एकीचे अस्तित्व मानावयाचे असेल, तर दुसरीचेही अस्तित्व मानल्यावांचून गत्यंतर नाहीं. एक टाकावयाची असेल तर दुसरीही टाकली पाहिजे. ज्याला जगाचेही अस्तित्व मान्य नसेल तोच अस्सलसशास्त्ररीतीचा-नास्तिक म्हणता येईल. कारण, दोहींकडेही एकाच पद्धतीची विचारसरणी लागू पडते. जर ईश्वराचे अस्तित्व हा भ्रम आहे असे म्हटलें, तर तीच विचारमालिका आणखी लांब करून, तृणापर्यंतच्या सर्व पदार्थांचे अस्तित्वही भ्रमरूपच आहे असे म्हटले पाहिजे. परमेश्वराच्या कल्पनेतील भ्रमाचा अंश पाहण्याइतकी ज्याची बुद्धि सूक्ष्म झाली असेल, त्याला स्वतःच्या शरिराचे आणि मनाचेही असत्यत्व पटले पाहिजे. परमेश्वर नष्ट झाला की, त्याबरोबरच देह आणि मन हीसुद्धां नष्ट झाली पाहिजेत; आणि हीं नष्ट झाली म्हणजे, जें कांहीं उरेल तें केवलरूप' मात्र उरेल. तेच अनाद्यनंतरूप आहे. “नैव वाचा न मनसा प्राप्तुं शक्यो न चक्षुषा" ( कठोपनिषत् २. ६. १२ ). शब्द, विचार, मन आणि बुद्धि यांचा आत्यंतिक विस्तार झाला, तरी ती जेथवर पोहोचू शकतात, ती मायेचीच हद्द आहे, हैं आपण नुक्तेच सिद्ध केले आहे; आणि मायेच्या हद्दीत जें कांहीं असेल ते सर्व भ्रमरूप आहे, हैं उघडच आहे. सत्य म्हणून जें कांहीं आहे, ते त्यापलीकडे आहे. त्या ठिकाणी विचार, मन, अथवा वाणी ही पोहोंचू शकत नाहींत. “यतो वाचो निवर्तते
अप्राप्य मनसासह ।”.