पान:विवेकानंद.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय


तिची सत्ता संपुष्टांत येईल. जोपर्यंत देश-काला- निमित्त या उपाधीची हद्द आपण ओलांडली नाहीं, तोपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या सर्व वल्गना व्यर्थ आहेत. मायेच्या कायद्याचें जाळे असे पक्के विणलेले आहे, की त्यांतून सुटका होण्याला तिच्या हद्दीच्या बाहेरच गेलें पाहिजे. तिच्या राज्यांत राहून तिच्या कायद्यांतून आपण पळवाटा शोधून काढूं ही तुमची घमेंड फुकट आहे. तुमच्या मनांत उद्भवणारा प्रत्येक विचार हा कारणाचें कार्य आहे. प्रत्येक विकारसुद्धां कार्यरूप आहे. याकरितां आमची इच्छा स्वतंत्र आहे असें ह्मणणें शुद्ध वेडेपणाचें आहे. सच्चिदानंदाचा अंश मायेच्या राज्यांत येऊन कायद्याच्या जाळ्यांत अडकल्यानंतर इच्छा आणि बुद्धि यांचा जन्म होतो. बुद्धि हा मायेच्या जाळ्यांत सांपडलेला सच्चिदानंदाचा अंश आहे. मग ती स्वतंत्र असणें शक्य आहे काय? मायेचें आवरण आहे तोपर्यंत स्वातंत्र्य हा शब्दही संभवत नाहीं.
 ज्याप्रमाणे एखादा दगड अथवा हें टेबल केवळ परतंत्र आहे, त्याचप्रमाणें तुमचा प्रत्येक विचार, तुमचा प्रत्येक शब्द, तुमची प्रत्येक कृति आणि तुमचें मनही परतंत्र आहे. मी या क्षणी आपणांशी भाषण करीत आहे आणि आपण ऐकत आहां; हीं दोन्ही कर्मे देश-काल-निमित्त यांच्या मर्यादेंतील आहेत. मायेच्या पलीकडे गेल्यावांचून खऱ्या स्वातंत्र्याची प्राप्ति होऊं शकतच नाहीं. आत्म्याच्या खच्या स्वातंत्र्याचें ठिकाण तेंच आहे. मायेच्या राज्यांत आपण इतके पक्के जखडले गेलों आहों. हें तत्त्व तीक्ष्णबुद्धीच्या माणसाला अगदीं सुल- भपणे लक्ष्यांत येण्याजोगे आहे. कारण, हें तत्त्व तर्कशास्त्राच्या जंत्रींत इतकें पक्के बांधलेले आहे कीं, बुद्धिगम्य मार्गाने जाणाराला तें कबूल केल्यावांचून गत्यंतरच नाहीं; पण स्वतःच् पारतंत्र्याची कबुली बुद्धि देत असतांही त्याचवेळीं आपण स्वतंत्र आहों ही भावनाही आपणांस पक्की चिकटून बसली आहे. ‘मी स्वतंत्र आहे' ही भावना आपणांस कोणत्याही क्षणीं सोडून जात नाहीं. ही भावना नष्ट झाली तर आपल्या हातून कोणतेंही कर्म घडणें शक्य नाहीं. कोणतीही गोष्ट करण्याचा विचार आपल्या चित्तांत येवो, त्यावेळी तसें करण्याला आपण मुखत्यार आहों - स्वतंत्र आहों - ही भावना जागृत नसेल तर आपल्या हातून त्या कर्माचा आरंभही होणार नाहीं. यावरून कोणतेंही कर्म सुरू होण्यापूर्वी आपल्या चित्तांत स्वातंत्र्यकल्पनेचें अस्तित्व असतें असें