पान:विवेकानंद.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


हा प्रश्न विचारावयाचा झाला, तर 'जे निमित्ताच्या पलीकडचें आहे, त्याला निमित्त करों लागलें ? असा विचारतां येईल. या वाक्यांत पृच्छक स्वतः- लाच कसा खोडून काढीत आहे, तें पहा. निमित्ताच्या पलीकडे पूर्णत्व आहे, हें वाक्याच्या आरंभींच पृच्छक कबूल करीत आहे; आणि नंतर, तें निमित्ताच्या उपाधींत कसें आलें, असा वाक्याचा उत्तरार्ध आहे. देश-काल-निमित्त ह्या उपा- धीच्या हृद्दींतच प्रश्न आणि उत्तरें संभवतात. या हद्दीच्या आंत आल्यावांचून प्रश्न करतांच येत नाहीं; पण ही हृद्द ओलांडली गेली म्हणजे प्रश्नच असं- भाव्य होतो. कारण, तसें करणें तर्कशास्त्राला सोडून होईल. यामुळे प्रश्नच जर संभवत नाही तर त्याला उत्तर तरी कोठून येईल ? देश-काल-निमित्त या उपाधीच्या हद्दीतच प्रश्न संभवतात आणि त्यांची उत्तरेंही मिळतात. यापली- कडे जें कांहीं उत्तर असेल त्याचा प्रत्यक्ष अनुभव, ही हद्द ओलांडल्यानंतर प्राप्त होईल. याकरितां या प्रश्नावर डोकेंफोड करणे म्हणजे असंभाव्य गोष्टीच्या मागें लागण्यासारखे आहे हे लक्ष्यांत ठेवून, हा असंभाव्य प्रश्न बाजूला ठेवर्णे यांतच शहाणपण आहे. एखाद्या मनुष्याला कांहीं रोग झाला तर प्रथम औषध घेऊन बरें होणे हे चांगलें, की हा रोग उद्भवला कसा याची शुष्क काथ्याकूट करीत बसणे चांगलें, हें आपणच ठरवा.
 हाच प्रश्न केवळ शास्त्रीय परिभाषेतून थोडा अलीकडे आणला, तर तो अधिक व्यवहार्य आणि स्पष्टीकरणात्मक होतो. व्यवहार्य भाषेत हा प्रश्न विचारावयाचा झटला तर हा भ्रम कोण उत्पन्न करतें, या शब्दांनीं विचारतां येईल. हा भ्रम सत्यानेंच उत्पन्न केला असेल काय ? नाहीं, खचित नाहीं. भ्रमापासूनच भ्रम उत्पन्न होतो. रोगापासूनच रोग उद्भवतो. आरोग्य हैं रोगाचें कारण कधीं स्वप्नांत तरी होऊं शकेल काय ? पाण्यापासून लाट उद्भवते, तथापि पाणी आणि लाट यांत वास्तविक कसलाच फरक असत नाहीं. कारण आणि कार्य ही सदैव एकरूप असतात, असे आपण पूर्वी अनेकवार सिद्ध केलेंच आहे. कार्याचें जें कांहीं स्वरूप असेल तेंच कारणाचेंही स्वरूप असले पाहिजे. आपण सध्या ज्याचा विचार करीत आहों, तें कार्य भ्रम हें आहे. याकरितां याचे कारणही भ्रम हेंच असले पाहिजे. हा भ्रम कोणी उत्पन्न केला, या प्रश्नाला उत्तर 'दुसऱ्या भ्रमानें' हेंच. हा दुसरा भ्रम कोणी निर्माण केला असाही प्रश्न उपस्थित झाला, तर त्याला उत्तर 'तिसऱ्या