पान:विवेकानंद.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन-प्रकरण ४ थें.

१६१


आणि आनंदमय असें सच्चिदानंदरूप, त्याच्या ठिकाणीं या विश्वभ्रमाची उत्पत्ति झाली कशी ? जगाच्या आरंभापासून अनेक वेळीं आणि अनेक ठिकाणीं या प्रश्नाची चर्चा झाली आहे. शास्त्रीय भाषा सोडून देऊन ग्राम्य भाषेनें हाच प्रश्न विचारावयाचा झाला, तर “जगांत पापाची उत्पत्ति कशी झाली ? " असा हा प्रश्न होईल. “ब्रह्माच्या ठिकाणीं जगन्म निर्माण झाला कसा ? " ही शास्त्रीय भाषा झाली; आणि जगांत पाप उत्पन्न झालें कसें, ही ग्राम्य भाषा झाली. यांत फरक फक्त भाषेचाच आहे. जगाच्या आरंभापासून अस्तित्वांत असलेले तत्त्वग्रंथ चाळून पाहिले, तर हा प्रश्न अगदी आरंभापासून उद्भवला असल्याचें आपणांस आढळून येईल. या दोन्ही प्रश्नांचें उत्तर एकच आहे. प्रश्न वेगळ्या भाषेत असले, तरी त्यांचें तात्पर्य एकच असल्यामुळे त्यांचें उत्त- रही एकच असणार हैं उघड आहे. जगांत पाप कसें उद्भवलें, या प्रश्नाला ख्रिस्तीशास्त्रानें जें उत्तर दिले आहे, त्यानें विवेचकबुद्धीचें समाधान मुळींच होणार नाहीं. मनुष्यजातीचा आद्यजनक आडाम आणि त्याची बायको ईव्ह, ह्रीं परमेश्वराजवळ नंदनवनांत राहत होती. तेथें एक ज्ञानवृक्ष होता. त्याचीं फळे खाऊं नको असें परमेश्वरानें आडामला सांगितलें होतें; पण एका सर्पानें ईव्हच्या द्वारें त्याचा बुद्धिभेद करून त्याजकडून तें फळ खावविलें. हा परमे- श्वराचा हुकूम आद्यपित्यानें तोडल्यामुळे जगांत पापाची उत्पत्ति झाली. ‘जगांत पापाची उत्पत्ति कशी झाली' हा प्रश्न जसा अत्यंत पोरकट आहे, त्याचप्रमाणे त्याला साजेसें हें उत्तरही पोरकटच आहे. जसा प्रश्न तसें उत्तर. पण सृष्टिरचनेचा विचार आपण शास्त्रीयरीत्या सुरू केला म्हणजे या प्रश्ना- लाही शास्त्रीयस्वरूप प्राप्त होऊन, 'पूर्णाच्या ठिकाणी जगम कसा झाला ? ' असें त्याचें पारिभाषिक भाषेत भाषांतर होतें. हा प्रश्न फारच नाजूक आहे आणि याचें उत्तरही त्याला साजेशा नाजुक भाषेतच दिले पाहिजे. याचें उत्तर थोडक्यांत अर्से आहे कीं, तुमचा प्रश्नच अशक्य कोटींतला असल्यामुळे त्याला उत्तर संभवतच नाहीं. हा प्रश्न विचारण्याचा तुम्हांला अधिकारच नाहीं. कां ? पूर्णत्व म्हणजे काय याचा विचार आपण पूर्वी केलाच आहे. देश-काल- निमित्त या उपाधीच्या पलीकडे जें कांहीं आहे, तें पूर्णरूप, अशी आपण त्याची व्याख्या सिद्ध केली, हें आपणांस आठवत असेलच. आतां तुमचा प्रश्न असा आहे की, पूर्णत्वास अपूर्णत्व कां प्राप्त झालें ? शुद्ध तर्कशास्त्राच्या परिभाषेत
 स्वा. वि. सं. ३-११.