पान:विवेकानंद.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६ ।

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

अथवा आत्मा हा सर्वोतर्यामी असून तो कोणत्याहि विशिष्ट गुणांनी युक्तः असा नाहीं. पुरुष स्वतः कोणत्याहि क्रियेचा कर्ता नसून तो केवळ साक्षी असतो. निरनिराळ्या रंगांची फुलें एकत्र करून त्यांच्या ढिगासमोर एखादा स्फटिक ठेवला तर त्या स्फटिकांत निरनिराळ्या रंगाचे मिश्रण दिसते. स्फटिक. शुद्ध शुभ्रवर्णाचा असतांहि तो अनेक रंगांनी युक्त आहे असा भ्रम पाहणाराच्या मनांत उत्पन्न होतो. त्याचप्रमाणे पुरुषाकडे कोणत्याहि क्रियेचे कर्तृत्व नसतांहि तो सर्व क्रिया करीत आहेसे भासते, हा भ्रम आहे असे सांख्यमत आहे. प्रकृति आणि पुरुष यांजबद्दलच्या सांख्यांच्या कल्पना वेदांतमतास मान्य नाहींत. प्रकृति आणि पुरुष ही स्वभावतःच भिन्नधर्मी असल्यामुळे या दोघांचे ऐक्य संभवत नाहीं असे वेदान्त्यांचे मत आहे. ही दोन जर अगदी भिन्नस्वभाव आहेत असे मानले तर ती एकत्र कां व्हावी आणि प्रकृतीची उपाधि पुरुषास कां लागावी असे वेदान्त्यांचे प्रश्न आहेत. या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देतां येत नाही. याकरितां, प्रकृति आणि पुरुष अथवा विश्व आणि परमात्मा हीं वस्तुतः एकरूपच आहेत असे वेदान्त्यांचे मत आहे. वेदान्तमताची अगदी खालची पायरी जे द्वैतमत त्यासहि हा सिद्धांत मान्य आहे. परमेश्वर हा सूक्ष्म व स्थूल विश्वाचे कारण आहे असे द्वैतवादीही कबूल करतात. आतां ही गोष्ट ते प्रत्यक्ष कबूल न करतां पर्यायाने कबूल करतात हे मात्र खरे आहे. परमेश्वर, आत्मा आणि सृष्टि अशा त्रयीचे कायमचें अस्तित्व आहे असे द्वैतमताचे प्रतिपादन आहे. आत्मा आणि सृष्टि हीं परमेश्वराच्या देहासारखी आहेत असे द्वैत्यांचे मत असल्यामुळे या तिहींचेहि वस्तुतः ऐक्य आहे हे त्यांस मान्य आहे असे ह्मणावयास हरकत नाहीं. तथापि हीं तीन अनंतकालपर्यंत एकमेकांपासून विभक्तच राहावयाची असेही त्यांचे ह्मणणे आहे. कल्पाच्या सुरवातीबरोबर ही त्रयी सृष्टि, जीवात्मा आणि परमेश्वर या तीन रूपांनी व्यक्त होते व कल्पाच्या अंतानंतर ती सूक्ष्म रूपांत राहते, आणि अशा रीतीने कल्पाच्या आरंभी अगर कल्पांतानंतरही या त्र्यांचे ऐक्य केव्हांच होत नाही असे द्वैतमताचे प्रतिपादन आहे. द्वैत-- वाद्यांचे हे ह्मणणे अद्वैतवाद्यांस मान्य नाहीं.

 बहुतेक सर्व उपनिषदें अद्वैतमताचे समर्थन करणारी असल्यामुळे अद्वैत-- मताची सर्व इमारत त्यांच्याच आधारावर उभारली गेली आहे. सर्व उपनि--